दोन्ही शूटरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सलमान खान फायरिंगप्रकरण

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या फायरिंगप्रकरणी दोन्ही शूटरची पोलीस कोठडीतून २७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सायंकाळी या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात जेलमध्ये पाठविण्यात आले. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर राऊत पाल अशी या दोघांची नावे असून त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या अनुजकुमार ओमप्रकाश थापन याने १ मेला गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याला वैद्यकीय कारणासाठी यापूर्वीही न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

१४ एप्रिलला सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार झाला होता. या गोळीबारानंतर दोन दिवसांनी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने सुरतच्या भूज शहरातून विकीकुमार सागरकुमार या दोघांना तर नंतर पंजाब येथून अनुजकुमार आणि सुभाषचंद्र यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना २९ एप्रिलला मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सुभाषचंद्र वगळता इतर तिघांना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीत त्यांची चौकशी सुरु असतानाच अनुजकुमारने पोलीस मुख्यालयातील पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे पोलीस कोठडीची मुदत संपत असलेल्या सागरकुमार आणि विकीकुमार यांना पुन्हा मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही २७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यांत गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. लॉरेन्स हा साबरमती जेलमध्ये असून त्याचा लवकरच गुन्हे शाखेकडून ताबा घेतला जाणार आहे. अनमोल हा विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. अनमोलच्या अटकेसाठी इंटरपोलच्या मदतीने भारताने प्रयत्न सुरु केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page