भिवंडीतील मित्राच्या घरातून साडेतीन कोटीची कॅश हस्तगत
एमडी ड्रग्ज तस्करीच्या मुख्य आरोपीच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – सांगलीतील ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य आरोपीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात गुन्हे शाखेला यश येत आहे. गेल्या सहा महिन्यांत ड्रग्ज विक्रीतून मुख्य आरोपी प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे यांनी कोट्यवधी रुपये जमा करुन ती कॅश त्याच्या ठाण्यातील भिवंडी येथे राहणार्या मित्राकडे ठेवल्याचे उघडकीस आले होते. या कबुलीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाने मित्राकडे ठेवलेली सुमारे साडेतीन कोटी रुपयांची कॅश हस्तगत केली आहे. एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश पकडली जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्यानंतर अशा तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाने कुर्ला, मिरारोड आणि सुरत येथून परवीनबानो गुलाम शेख, साजिद मोहम्मद आसिफ शेख ऊर्फ डेबस, इजाजअली इमदादअली अन्सारी, आदित्य इम्तियाज बोहरा या चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी सहा कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत सव्वाबारा लाखांची कॅश, दिड लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. तपासात एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही एक सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले होते. या आरोपींच्या चौकशीनंतर या पथकाने सांगलीतील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एमडी ड्रग्ज बनविणार्या कारखान्यात कारवाई केली होती. २५ मार्चला केलेल्या या कारवाईत पोलिसांनी कारखान्यात २४५ कोटी रुपयांचा १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. यावेळी या टोळीचा म्होरक्या प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे याच्यासह त्याचे पाच सहकारी वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद बाळासो मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी आणि लक्ष्मण बाळू शिंदे अशा सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. तपासात प्रविणनेच सांगलीत एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु करुन परवीनबानोसह इतरांच्या मदतीने विविध शहरात एमडी ड्रग्जची विक्री सुरु केल्याची कबुली दिली होती. या कारखान्यातून पोलिसांनी २५२ कोटी २८ लाख रुपयांचा १२६ किलो ६४१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसहीत इतर मुद्देमाल हस्तगत केला होता. अटकेनंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असताना या आरोपींच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते. याच चौकशीत प्रविण शिंदे त्याच्या ठाण्यातील भिवंडी येथे राहणार्या एका मित्राच्या घरी एमडी ड्रग्ज विक्रीतून आलेली कॅश जमा केल्याचे सांगितलेह होते. त्याची शहाशिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाने शनिवारी या मित्राच्या घरी छापा टाकून ३ कोटी ४६ लाख ६८ हजार २०० रुपयांची कॅश जप्त केली आहे. गेल्या सहा महिन्यांत एमडी ड्रग्ज विक्रीतून ही कॅश जमा करण्यात आली होती. या कॅशबाबत प्रविणने कोणाला काहीही माहिती दिली नव्हती. मात्र त्याच्या चौकशीतून ही माहिती बाहेर आली आणि पोलिसांनी ही कॅश हस्तगत केली आहे.
- ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या पथकातील घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, शिंदे, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बाळगी, स्वप्ना शहापूरकर, निरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल काळे, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्नील काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, महिला पोलीस फौजदार निधी धुमाळ, स्नेहा नाईक, सहाय्यक फौजदार अरुण सावंत, तानाजी उबाळे, पोलीस हवालदार दिपक पवार, संतोष गुरव, प्रदीप बडगुजर, सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, अजय बल्लाळ, गिरीश जोशी, अस्लम शेख, विनोद शिरापुरी, प्रमोद जाधव, प्रकाश भोई, महिला पोलीस हवालदार सिमा तिरोडकर, पोलीस नाईक विलास राऊत, पोलीस शिपाई प्रमोद शिंदे, लुकमान सय्यद, महेश सावंत, जितेंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई हिना शेख, पोलीस हवालदार चालक राजाराम कदम, पोलीस शिपाई चालक दिलीपराव राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.