प्रेयसीचा मोबाईल क्रमांक शेअर करुन बदनामीसह विनयभंग
अश्लील संभाषण करुन मानसिक शोषण करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जुलै २०२४
मुंबई, – इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून एका २२ वर्षांच्या तरुणीची प्रियकराने तिचा मोबाईल क्रमांक इतर अज्ञात व्यक्तींना शेअर करुन तिची बदनामीसह विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. त्याने व्हायरल केलेल्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून तिचा मानसिक शोषण सुरु होता. या शोषणाला कंटाळून तिने सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली आहे. याप्रकरणी मोईन पठाण या प्रियकरासह इतर तीन ते चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
२२ वर्षाची तक्रारदार तरुणी ही सांताक्रुज येथे राहते. मोईन हा तिचा मित्र असून सहा ते सात वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानंतर त्याने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्यास होकार दिला होता. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंंबंध होते. गेल्या वर्षी त्याने तिला फोन करुन तिला त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी मोईनने तिला त्याच्याकडे तिचे काही वस्तू आहेत, ते सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. तसेच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा विचार करु नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील असे धमकाविले होते. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर तिला विविध मोबाईल क्रमांकावरुन कॉल येत होते. संबंधित अज्ञात व्यक्ती तिच्याशी अश्लील संभाषण करुन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होते. तिच्याशी नको असलेली जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.
सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र सतत येणार्या कॉल आणि अश्लील मॅसेजचा तिला कंटाळा आला होता. या अज्ञात व्यक्तीकडून तिचा मानसिक शोषण सुर होता. त्यामुळे घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगितला. या तक्रारीत तिने तिचा प्रियकर मोईनसह इतर तीन ते चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलिसांना गुन्हा दाखल करुन दोषी व्यक्तीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या आरोपीविरुद्ध ३५४ (अ), ३५४ (डी), ५०६, ५०९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीकडून पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक प्राप्त केले असून या मोबाईल क्रमांकावरुन आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.