आठ वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून लैगिंक अत्याचार
सांताक्रुज येथील शाळेतील घटना; शिपायाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मार्च २०२४
मुंबई, – तिसरीमध्ये शिकणार्या आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील शिपायाने डिसेबर ते मार्चदरम्यान शाळेतच लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी शिपायाविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने पिडीत मुलीसह इतर शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
पिडीत आठ वर्षांची मुलगी ही तिच्या पालकांसोबत सांताक्रुज परिसरात राहते. याच परिसरात असलेल्या शाळेत ती तिसरी इयत्तेत शिकते. याच शाळेत आरोपी शिपाई म्हणून काम करतो. डिसेंबर २०२३ रोजी ती वर्गात जात असताना त्याने तिला एका रुममध्ये नेले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस म्हणून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याने तिला मारहाणही केली होती. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्याचाच त्याने गैरफायदा घेतला. डिसेबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत त्याने अनेकदा या मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. काही दिवसांपासून तिला चालताना त्रास होत होता. त्यातच तिची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला तिच्या पालकांनी रुग्णालयात नेले होते. तिथे तपासणीनंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. डॉक्टराकडून ही माहिती समजताच तिच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी तिला गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने शाळेतील शिपाई तिच्यावर अश्लील चाळे करुन लैगिंक अत्याचार करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला सांताक्रुज पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिपायाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षकांसह पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.