शाळेत प्रवेश देण्याच्या आमिषाने वयोवृद्धाची फसवणुक
फसवणुक करणार्या उत्तरप्रदेश टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – दक्षिण मुंबईतील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या नातूला प्रवेश देण्याच्या आमिषाने एका ७४ वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक करणार्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर या कटातील दोन मुख्य आरोपींना गावदेवी पोलिसांनी अटक केली. आशिष जितेंद्र शुक्ला आणि मेहफुज जकी अहमद शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच कटात यापूर्वी पोलिसांनी धर्मेद्रप्रसाद शारदाप्रसाद याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानेच तक्रारदार वयोवृद्धाला शाळेचा प्रशासकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन डोनेशनच्या नावाने साडेतीन लाख रुपये एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले आहे.
विमलदेव हिरजी ठक्कर हे तक्रारदार गावदेवी येथील नूर मेंशन अपार्टमेंटमध्ये त्यांच्या पत्नी, मुलगा त्याची पत्नी आणि साडेतीन वर्षांच्या नातूसोबत राहतात. नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी त्याच्या शाळेच्या प्रवेशासाठी कुलाबा येथील एका नामांकित शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जानंतर ११ जानेवारी २०२४ रोजी त्यांना मुलाखतीसाठी शाळेत बोलाविण्यात आले होते. अर्जासोबतच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना पंधरा दिवसांत प्रवेशाबाबत कळविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. १७ जानेवारीला त्यांची पत्नी देवीला हिला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. हा फोन विमलदेव यांनी घेतला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांच्या नातूच्या शाळेच्या प्रवेशाबाबत बोलायचे आहे असे सांगितले.
शाळेत प्रवेशासाठी त्याने त्यांना साडेतीन लाख रुपये डोनेशन द्यावे लागतील असे सांगून एका बँकेचा खाते क्रमांक दिला होता. डोनेशनची साडेतीन लाख रुपये आणि वार्षिक फी ९५ हजार रुपये भरल्यानंतर त्यांच्या नातूला हमखास प्रवेश मिळेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी संबंधित बँक खात्यात साडेतीन लाख रुपये ट्रान्स्फर करुन पैसे भरल्याचे स्लिप त्याला व्हॉटअपवर पाठवून दिले होते. त्यानंतर त्यांना १९ जानेवारीला शाळेत येण्यास सांगण्यात आले. तिथे गेल्यानंतर अपॉईटमेंट नसल्याने त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकार्याला फोन केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्या पत्नीला कॉल करणार्या धर्मेद्रप्रसाद शारदाप्रसाद याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून आशिष शुक्ला आणि मेहफुज शेख यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आशिषला २१ फेब्रुवारी तर मेहफुज याला २३ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून फसवणुक करणारी एक सराईत टोळी आहे. या टोळीने इतर काही ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध व्ही. पी रोड पोलीस ठाणयात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यांत या तिघांना पोलिसांनी अटक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.