शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने 75 वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक
25 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी फर्म मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने एका 75 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची त्याच्याच परिचित व्यावसायिकाने सुमारे 25 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी फर्मच्या मालक असलेल्या व्यावसायिकाविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश अशोक सोलंकी असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवाशी आहे तर त्याची लोअर परेल परिसरात एक खाजगी फर्मचे कार्यालय आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आदर्शवीर पूरणचंद्र जैन हे 75 वर्षांचे वयोवृद्ध जुहू येथील चंदन सिनेमा, देवपार्क बंगलो क्रमांक पाचमध्ये त्याचंया पत्नी आणि नातूसोबत राहतात. ते व्यावसायिक असून त्यांची ईशपंजाब ट्रेडर लिमिटेड नावाची वस्तू आयात करण्याची एक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय सांताक्रुज परिसरात आहे. त्यांचे एका खाजगी बँकेत अकाऊंट असून याच बँकेत त्यांची भाग्यश्री व तिचा पती विनय पुरी यांच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही त्यांना विविध गुंतवणुक योजनेची माहिती सांगून त्यांना आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देत होते.
त्यांच्या मार्फत त्यांची कल्पेश सोलंकीशी ओळख झाली होती. त्याने त्याची स्वतची एक फर्म असल्याचे सांगून या फर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे शेअरमध्ये पैसे गुंतवणुक केली आहे. त्यात त्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला देत त्यांचे डिमॅट खाते उघडून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला डिमॅट खाते उघडून या खात्यामार्फत शेअरमध्ये गुंतवणुक करण्यासाठी 25 लाख रुपये दिले होते.
ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्यात जानेवारी 2022 रोजी एक कायदेशीर करार झाला होता. काही दिवसांनी त्यांनी त्याला शेअरबाबत विचारणा केली असता त्याने त्यांच्याऐवजी त्याच्या डिमॅट खात्यातून शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे सांगून त्यांना सोळा शेअरची यादी पाठवून दिली होती. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी त्याने त्यांना पाच लाखांचा धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. पैशांची मागणी केल्यानंतर कल्पेशने त्याचे डिमॅट खाते आयकर विभागाने फ्रिज केल्याचे सांगितले.
काही दिवसांनी त्याने त्यांना 32 लाख 40 हजाराचा धनादेश दिला, मात्र हा धनादेशही बँकेत न वटता परत आला. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कल्पेशने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कल्पेशविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.