शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन बहिणींची फसवणुक

कांदिवलीतील घटना; अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कांदिवलीतील दोन सख्ख्या बहिणीची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे साडेअकरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कुठलीही शहानिशा न करता शेअरमध्ये चांगल्या परताव्याच्या आमिषाला बळी पडून गुंतवणुक करणे या दोन्ही बहिणींना चांगले महागात पडले आहे.

४८ वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली येथे राहत असून तिच्या लहान बहिणीच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे ती तिच्या आजारी बहिणीची विशेष काळजी घेते. मार्च महिन्यांत तिला सोशल मिडीयावर रोबो टेडिंगसंदर्भातील एक जाहिरात दिसली होती. त्यात शेअर खरेदीसह ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या जाहिरातीमध्ये तीन मोबाईल क्रमांक होते. त्यामुळे तिने संबंधित मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तिचा विश्‍वास संपादन करताना तिला शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना तिला चांगला परतावा मिळवून देतो असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे तिने तिच्या बहिणीची चर्चा करुन शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या दोघींनी शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. मार्च ते जुलै २०२४ या कालावधीत तिने ३ लाख २० हजार तर तिच्या बहिणीने ८ लाख २० हजार रुपये असे ११ लाख ४० हजार रुपयांची शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. ही रक्कम या दोघींनी संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना परताव्याची रक्कम पाठविली नव्हती. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तींकडे चॅटद्वारे याबाबत विचारणा सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी त्यांचे मोबाईल ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच या महिलेने कांदिवली पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने तीन मोबाईल क्रमांक पोलिसांना देऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा कांदिवली पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page