शेअरमध्ये चांगला परतावा देतो असे सांगून दोघांची फसवणुक
मुलुंड व ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर अल्पावधीत चांगला परतावा देतो असे सांगून असे सांगून दोन व्यक्तींची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार मुलुंड आणि जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलुंड आणि ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. एका गुन्ह्यांत शाळेच्या मित्रानेच त्याच्या पत्नीच्या मदतीने त्याच्या बालपणीच्या मित्राला सुमारे पंधरा लाखांन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या मित्राच्या तक्रारीवरुन पोलिसांनी यतिन गुलाबचंद गुडका आणि त्याची पत्नी मित्तली यतिन गुडका या पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
४७ वर्षांचे पंकज महेश शर्मा हे ठाण्यातील घोडबंदर रोडवर राहत असून त्यांचा भांडुप येथे स्विच गिअर पार्टचा स्वतचा व्यवसाय आहे. त्यांचा यतिन गुडका हा शाळेचा मित्र असून २०१८ साली त्याची त्यांच्याशी बर्याच वर्षांनी भेट झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. यतिन त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी येताना विविध आलिशान कारमधून येत होता. शेअर खरेदी-विक्रीत त्याला प्रचंड फायदा झाला असून त्याने अनेकांना शेअरमध्ये चांगला फायदा करुन दिला आहे असे सांगत होता. त्याची एक कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून त्याने अनेकांचे पैसे शेअरमध्ये गुंतवले आहेत. त्यात त्यांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे त्यांनीही त्याच्या कंपनीत गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यतिन आणि मित्ताली यांनी त्यांना सहा महिन्यांच्या गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे सुमारे पंधरा लाखांची गुंतवणुक केली होती. मे २०२० रोजी पंकज शर्मा यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी केली होती. यावेळी त्याने त्यांना एक धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. चौकशीदरम्यान यतिन व त्याच्या पत्नीने अशाच प्रकारे आशिष मांजरेकर, आशिष गुप्ता, मनोज सणस, संकेत भालेराव, सीमा हेमाणी आणि उदय सावंत यांच्याकडून शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे घेतले होते, मात्र त्यांना गुंतवणुक रक्कमेसह कुठलाही परवाता दिला नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मुलुंड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर यतिन आणि त्याची पत्नी मित्तालीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्या संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण कायदा कलमातर्ंगत गुन्हा नोंदविला आहे. या दोघांनी तक्रारदार पंकज शर्मा यांची पंधरा लाखांची फसवणुक केली असली तरी फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दुसर्या घटनेत एका ३१ वर्षांच्या तरुणाची अज्ञात व्यक्तीने साडेनऊ लाखांची फसवणुक केली होती. तक्रारदार कोमरगिरी वेंकटा आदित्य सांबा शिवाराम हा जोगेश्वरीतील आनंदगर, एसबीआय स्टाफ वसाहतीत राहतो. त्याला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे २४ डिसेंबरला तो गुगलवर शेअरमार्केटमध्ये गुंतवकीबाबत माहिती काढत होता. ही माहिती काढत असताना त्याने एका वेबसाईटवर स्वतची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्याला व्हॉटअपवर एका अज्ञात व्यक्तीने शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के परतावा देतो असे सांगून त्याला ब्लॅक स्टोन या नामांकित कंपनीची माहिती दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत याच कंपनीतील शेअरमध्ये ९ लाख ६१ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याला कुठलाही परवाता मिळाला नाही. त्यामुळे त्याने संबंधित व्यक्तीला फोन करुन विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना दुसर्या आयपीओमध्ये ३२ लाख रुपयांची गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला. ही रक्कम गुंतवणुक केल्यानंतर त्याला आणखीन चांगला परवाता मिळेल असे सांगितले. मात्र त्याने गुंतवणुक करण्यास नकार देत त्याचे पैसे परत करण्याची विनंती केली होती. यावेळी समोरील व्यक्तीने त्याला प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने सायबर सेलच्या वेबसाईटसह ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.