मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 नोव्हेंबर 2025
मुंबई, – टँकरमध्ये भरलेला पेट्रोल चोरी करुन चोरी केलेल्या पेट्रोलची बाजारात कमी किंमतीत विक्री करणार्या टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्रकुमार रामनाथ यादव, राजकुमार ललनप्रसाद वर्मा, अमीत रामहित यादव आणि संजय पारसनाथ वर्मा अशी या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी मानखुर्द व चेंबूरचे रहिवाशी असून चालक म्हणून काम करतात. आरोपींकडून पोलिसांनी एक टेम्पो, तीन टँकर, एक कॅन, वीस रिकामे लोखंडी ड्रम, दोन रिकाम्या बादल्या, दोन नरसाळे, स्कू ड्राव्हर आणि पेट्रोलचा साठा असा 62 लाख 91 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात आरिफ रमेश सरोज, जमशेद संतोष यांचा समावेश आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
काही वाहनचालक टँकरमध्ये भरलेला पेट्रोल कंपनीने दिलेल्या मार्गावरुन न देता दुसर्या मार्गाने नेऊन टँकरमधील पेट्रोल चोरी करुन चोरीच्या पेट्रोलची नंतर कमी किंमतीत विक्री करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत शिवडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर शिवडी पोलिसांनी या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच संबंधित आरोपी शिवडीतील कोलडेपो, फसबेरी रोड, ए फ्लॅट क्रमांक 1 सीसमोर टँकर पार्क करुन पेट्रोलची चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व अन्य पोलीस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता तिथे आलेल्या काही टँकरमधून चालक त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने पेट्रोलची चोरी करत असताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तिथे छापा टाकून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात या चौघांची नावे महेंद्रकुमार, राजकुमार, संजय आणि अमीत असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण मानखुर्द आणि चेंबूर परिसरात राहत असून टँकरचालक म्हणून काम करत होते.
गेल्या काही वर्षापासून ही टोळी पेट्रोलची चोरी करुन चोरी केलेल्या पेट्रोलची कमी किंमतीत विक्री करत होती. ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा, टँकर आणि चोरीसाठी लागणारे साहित्य असा सुमारे 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान चारजण पळून गेले होते. त्यांची नावे पोलिसांना समजली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पेट्रोल चोरी करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांच्या पेट्रोलची चोरी करुन त्याची विक्री केल्याचे बोलले जाते.