एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस ओरिसाहून अटक

जामिनावर बाहेर येताच अटकेच्या भीतीने पळून गेला होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 नोव्हेंबर 2025
मुंबई, – एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी ओरिसा येथून अटक केली. अहमद मोहम्मद शफी शेख ऊर्फ अकबर खाऊ असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अकबर खाऊ हा ड्रग्जच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अठराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ठाण्यातील एका ड्रग्जच्या गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती, या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच अटकेच्या भीतीने तो पळून गेला होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अलीकडेच एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांत फरीद रेहमतुल्ला शेख ऊर्फ फरीद चुहा नावाच्या एका आरोपीस घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 64 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत 12 लाख 80 हजार रुपये होती. चौकशीत त्याला ते एमडी ड्रग्ज अकबर खाऊ याने दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन याच गुन्ह्यांत फरीद चुहाला अटक केली होती तर अकबर खाऊ याला पाहिजे आरोपी दाखविले होते.

त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला मोक्का कायद्यांतर्गत अटक झाली होती. याच गुन्ह्यांत त्याला जामिन मंजूर झाला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झाला होता, मात्र अटकेच्या भीतीने तो एकाच ठिकाणी वास्तव्य करत नव्हता. वेगवेगळ्या शहरात लपत होता. गेल्या काही दिवसांपासून तो ओरिसा येथून एमडी ड्रग्जचा व्यवहार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर त्याच्या अटकेसाठी घाटकोपर युनिटचे एक विशेष पथक ओरिसा येथे गेले होते. त्याचा शोध सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक भगवान बेले, दिगंबर पाटील व अन्य पोलिसांनी त्याला सुंदरगढ, राजगंगापूर येथून शिताफीने अटक केली.

चौकशीदरम्यान तो ड्रग्जच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला ट्रान्झिंट रिमांड घेतल्यानंतर पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर त्याला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अकबर खाऊ हा एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध कुर्ला पोलीस ठाण्यात चौदा, अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलमध्ये तीन तर व्ही. बी नगर पोलीस ठाण्यात दोन असे अठरा गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे ड्रग्जशी संबंधित असून त्यातील काही गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page