घरासह दोन दुकानासाठी दिलेल्या २४ लाख रुपयांचा अपहार
सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – घरासह दोन दुकानासाठी दिलेल्या सुमारे २४ लाखांचा अपहार करुन एका टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस सहा महिन्यानंतर जुहू पोलिसांनी अटक केली. विजय लक्ष्मण देवेंद्र असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याने घरासह फ्लॅटचा अन्य कोणासोबत व्यवहार करुन त्यांची फसवणुक केली का याचा पोलीस तपास करत आहेत.
चंद्रशेखर संताराम जायस्वार हे धारावी परिसरात राहत असून त्यांचा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. त्यांना मुंबई स्वतच्या हक्काचे घर घ्यायचे होते, त्यासाठी ते जागेचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना त्यांच्या परिचित मित्राने विलेपार्ले येथील नेहरुनगर येथे एक रुम आणि दोन दुकान विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी रुम आणि दोन्ही दुकानाची पाहणी केली होती. ती प्रॉपटी विजय देवेंद्रच्या मालकीची होती. घरांसह दोन्ही दुकानाची किंमत त्याने त्यांना ४८ लाख रुपये सांगितली होती. ही प्रॉपटी चांगली वाटल्याने त्यांनी घरासह दोन्ही दुकाने खरेदीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी विजयला टप्याटप्याने २४ लाख अकरा हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम ६० दिवसांत देण्याचे ठरले होते. त्यानंतर घरासह दोन्ही दुकान त्यांच्या नावावर होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. लॉकडाऊननंतर त्यांनी पुन्हा व्यवहार सुरु केला होता. यावेळी त्यांना ही प्रॉपटी विजयच्या मालकीची नसून त्याची बहिण आरई देवेंद्र हिच्या नावावर असल्याचे समजले. याबाबत जाब विचारला असता त्याने बहिणीच्या सांगण्यावरुन त्याने या प्रॉपटीचा व्यवहार केल्याचे सांगितले.
मात्र प्रत्यक्षात बहिणीला कधीच समोर आणले नाही. विजयकडून फसवणुक होत असल्याने त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. मात्र त्याने पैसे देण्यास नकार देऊन त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. प्रॉपटी खरेदी विक्रीचा व्यवहार करुन सुमारे २४ लाखांचा अपहार करुन विजयने त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक, शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला विलेपार्ले येथून पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.