मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ डिसेंबर २०२४
मुंबई, – दुकानातील साफसफाई करताना ड्राव्हरमधील चांदीचे कॉईन चोरी केल्याप्रकरणी मणिरत्न ज्वेलर्स दुकानातील सेल्समन श्रवण भैरुसिंग राजपूत याला मालाड पोलिसांनी अटक केली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत त्याने सुमारे सव्वासात लाखांचे आठ किलो चांदीचे कॉईन चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
महेंद्र चंपालाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून अंधेरीतील हेरीटेज अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या मालकीचे मालाडच्या मार्वे रोड, शांती सदन इमारतीमध्ये मणिरत्न ज्वेलर्स नावाचे एक सोन्याचे दुकान आहे. त्यांचा सोन्याचे दागिने विक्रीसह जुने दागिने खरेदी करण्याचा व्यवसाय आहे. या दुकानात पंधरा कामगार असून तीन सुरक्षारक्षक २४ तासांसाठी तैनात करण्यात आले होते. १० डिसेंबरला ते त्यांचे पार्टनर विनीत भिमराज सुराणा यांच्यासोबत शॉपमधील सीसीटिव्ही फुटेज पाहत होते. यावेळी त्यांना त्यांच्या दुकानातील सेल्समन श्रवण राजपूत याची हालचाल संशयास्पद वाटली होती. काही वेळानंतर त्यांना तो ड्राव्हरमधील चांदीचे कॉईन खिशात टाकत असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी इतर दिवसांचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात त्यांना श्रवण हा दुकानातील दागिने चोरी करत असल्याचे दिसून आले होते.
दुकानातील साफसफाई करण्याचा बहाणा करुन त्याने दागिन्यांसह कॉईनची चोरी केल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी दुकानातील दागिन्यांची तपासणी सुरु केली होती. यावेळी त्यांना सुमारे सव्वासात लाख रुपयांचे आठ किलो चांदीचे कॉईन चोरीस गेल्याचे समजले होते. ही चोरी त्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांत केली होती. हा प्रकार उघडकीस येताच महेंद्र जैन यांनी मालाड पोलिसांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी श्रवण राजपूतविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.