48 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जासह व्यावसायिक गाळे व शाळेत प्रवेशाच्या नावाने गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – ट्रॅव्हेल्स व्यावसायिक महिलेची सुमारे 48 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका दाम्त्यांविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ग्रिष्मा जगदीश रावळ आणि राजेश वेलानी अशी या पती-पत्नींची नावे आहेत. दोन कोटीच्या कर्जासह म्हाडाचे दोन व्यावसायिक गाळे स्वस्तात देण्याचे तसेच मुलीला बीकेसीच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेशाच्याने या दोघांनी गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

आरती गिरीजाशंकर त्रिवेदी ही महिला ट्रॅव्हेल्स व्यावसायिक असून ती तिच्या कुटुंबियांसोबत सायन परिसरात राहते. तिच्या मालकीची पॅराडाईज कॅबिनस टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्स नावाची कंपनी आहे. तिची हर्षा अजय पांचाळ नावाची परिचित ट्रॅव्हेल्स बिझनेस करणारी महिला असून तिने तिच्याकडे अनेकदा तिच्या ग्राहकांचे तिकिट बुकींगचे काम दिले होते. सप्टेंबर 2023 रोजी तिने तिला 50 लोकांचे विमानाचे तिकिट काढण्यास दिले होते, मात्र संबंधित विमान कंपनी बंद झाल्याने तिने तिच्या पैशांची मागणी केली होती. याच दरम्यान तिने तिची ओळख ग्रिष्माशी करुन दिली होती. तिने तिचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते.

याच दरम्यान आरतीची ग्रिष्माशी वांद्रे येथे भेट झाली होती. या भेटीदरम्यान तिने तिची विविध बँकेत ओळख असल्याचे सांगून तिला व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. तिला कर्जाची गरज होती, त्यामुळे तिने तिचे सर्व कागदपत्रे ग्रिष्माला दिले होते. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर तिने तिला एक कोटीचे कर्ज देते असे सांगितले. त्यासाठी ग्रिष्मासह तिच्या पती राजेश वेलानी तिच्याकडे आठ टक्के कमिशनची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्यांना आठ लाख रुपये दिले होते. त्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. कर्जाची गरज असल्याने तिनेही त्यांना पैसे दिले होते. याच दरम्यान त्यांनी तिला बोरिवली मेट्रो स्टेशनजवळ म्हाडाचे दोन व्यावसायिक गाळे आहेत, ते दोन्ही गाळे तिला स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी तिच्याकडून साडेबारा लाख रुपये घेतले होते.

काही दिवसांनी आरतीने ग्रिष्माला कॉल करुन तिच्या मुलीचे बीकेसी येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश करायचे आहे, कोणी ओळखीचा असेल तर तिला सांगण्याची विनंती केली होती. यावेळी ग्रिष्माने तिचे पती राजेशशी तिथे ओळख असून तिच्या मुलीचे प्रवेश होईल असे सांगून मुलीच्या प्रवेशासाठी पंधरा लाख रुपये घेतले होते. अशाच प्रकारे ग्रिष्मा आणि राजेशने तिला दोन कोटीचे कर्जासह म्हाडाचे दोन व्यावसायिक गाळे स्वस्तात देतो तसेच तिच्या मुलीचे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत 48 लाख 50 हजार रुपये घेतले होते.

मात्र तिला बँकेतून कर्ज मिळवून दिले, व्यावसायिक गाळ्याचा ताबा दिला नाही तसेच तिच्या मुलीला शाळेत प्रवेश दिला नव्हता. या पती-पत्नीकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच आरतीने त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी या दोघांनी तिला शिवीगाळ करुन धमकी देत तिचे पैसे परत करणार नाही असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच आरती त्रिवेदीने घडलेला प्रकार सायन पोलिसांना सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ग्रिष्मा रावळ आणि राजेश वेलानी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रिष्मा आणि राजेश हे दोघेही पती-पत्नी असून ते दोघेही कांदिवलीतील चारकोप, बोरा कॉलनीतील कैलास टॉवरमध्ये राहतात. या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page