वयोवृद्धेसह दोन महिलांवर नोकराकडून प्राणघातक हल्ला
हल्ल्यानंतर आरोपीचे पलायन; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – एक दिवसांच्या कामासाठी ठेवलेल्या नोकराने एका वयोवृद्धेसह दोन महिलांवर लोखंडी मसाला कुटण्याच्या मुसळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात घडली. या हल्ल्यात शोभा कन्नू बिवीन रेखारी आणि तिची आतेबहिण बीणा भट या दोघीही जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी २० वर्षांचा आरोपी नोकर अजीत मुखिया याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना मंगळवारी ७ जानेवारीला दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास अंधेरीतील शास्त्रीनगर क्रमांक एक, जिप्सी रोज इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ७०३ मध्ये शोभा कन्नू बिपीन रेखारी ही ७४ वर्षांची वयोवृद्ध महिला राहते. मंगळवारी तिच्या घरी काही नातेवाईक आले होते. त्यातच तिचा नोकर बाहेर गेल्याने त्याने एक दिवसांसाठी अजीत मुखियाला त्यांच्या घरी कामासाठी पाठविले होते. ठरल्याप्रमाणे अजीतने सर्वांसाठी जेवण केले होते. दुपारी जेवण केल्यानंतर चंद्रा भंडारी आणि शिला भंडारी या त्यांच्या घरी निघून गेल्या होत्या. यावेळी शोभा या त्यांची आतेबहिण बीणा भट या दोघीही बेडरुम व सोफ्यावर झोपल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता वीणा भट हिचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने शोभा या बेडरुममधून बाहेर आल्या. यावेळी त्यांना अजीत हा बीणा यांच्या डोक्यात लोखंडी मसाला कुटण्याच्या मुसळीने मारहाण करत असल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने त्याने शोभा यांच्या डोक्यातही मुसळीने हल्ला केला होता.
या हल्ल्यात त्या दोघीही गंभीररीत्या जखमी झाल्या. हल्ल्यानतर अजीत तेथून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या शोभा रेखारी आणि बीणा भट यांना तातडीने जवळच्या कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे रेखा यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले तर बीणा यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना तिथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी रेखा यांच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अजीत मुखिया याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या हल्ल्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. अजीतच्या अटकेनंतरच त्याने हा हल्ला का केला याचा खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.