मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – कौटुंबिक वादातून पतीकडून होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका ३३ वर्षांच्या महिलेने व्हेलनटाईनच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भायखळा परिसरात उघडकीस आली आहे. तेहमिना अस्लम कांडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती अस्लम इमाम कांडे आणि नंणद तब्बसूम अब्दुल करीम शेख यांच्याविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.
रझीया वसीम अन्सारी ही ६९ वर्षाची वयोवृद्ध महिला भायखळा येथे राहते. तिच्या पतीचे निधन झाले असून तिला सबा समीर शेख, अंबरिन वसीम सय्यद, तेहमिना अस्लम कांडे आणि कुदसिया साहिल शेख या चार मुली आहे. चारही मुलींचे लग्न झाले असून त्या चौघीही त्यांच्या पतीसोबत सासरी राहतात. जानेवारी २०१६ रोजी तेहमिना या मुलीचे ट्रॅव्हेल्स एजंट असलेल्या अस्लमसोबत विवाह झाला होता. लग्नाच्या काहीच दिवसांनी कौटुंबिक घरगुती कारणावरुन त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यामुळे त्याने तिला तिच्या माहेरी आणले होते. यावेळी तेहमिनाने तिच्या आईला अस्लम हा क्षुल्लक कारणावरुन तिच्याशी वाद घालून, शिवीगाळ करुन तिला मारहाण करत असल्याचे सांगितले होते. मात्र तिने तिची समजूत काढून तिला पुन्हा पतीसोबत राहण्यासाठी सांगत होती. त्यामुळे ती पुन्हा त्याच्यासोबत घरी निघून आली होती.
काही दिवसांनी पुन्हा त्यांच्यात खटके उडू लागले. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. घरी घरखर्चासाठी पैसे देत नव्हता. तिच्या शरीरासह कपड्यावरुन तो तिला सतत टोमणे मारत होता. अस्लमला त्याची बहिण तब्बसूम ही भडकावत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. तिनेच तिच्याविरुद्ध ती मानसिक रुग्ण असल्याचे पुरावे गोळा करण्यास सांगितले होते. सततच्या मानसिक व शारीरिक शोषणाला तेहमिना ही कंटाळून गेली होती. ती प्रचंड नैराश्यात होती. त्यातच त्याने तिच्यासोबत राहायचे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे रझिया ही तेहमिनाला तिच्या घरी घेऊन आली होती. याच दरम्यान तिला अस्लमने दुसर्या तरुणीशी लग्न केल्याचा तिला संशय होता. त्यामुळे ती आणखीन नैराश्यात गेली होती.
१४ फेब्रुवारी सायंकाळी तिने तिच्या आईच्या राहत्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रझिया अन्सारीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात तिने तेहमिनाच्या आत्महत्येस तिचा पती अस्लम कांडे आणि नणंद तब्बसूम शेख हीच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ करुन एका विवाहीत महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.