दहा हजाराच्या लाचप्रकरणी तुरुंग अधिकार्‍यासह शिपायाला अटक

कारागृहात त्रास न देण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – दहा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी तळोजा कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती मानेजी कन्नेवाड आणि पोलीस शिपाई राहुल परमेश्‍वर गरड या दोघाना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. एका गंभीर गुन्ह्यांत कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला त्रास न देण्यासाठी या दोघांनी त्याच्या भावाकडे पैशांची मागणी केली होती. यापूर्वी या दोघांनी त्याच्या भावाकडून ऑनलाईन एक हजार रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने मंगळवार १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदाराच्या भावाविरुद्ध एका गंभीर गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. गेल्या सहा वर्षांपासून तो न्यायालयीन कोठडीत नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कारागृहातील अधिकार्‍यासह कर्मचार्‍याकडून त्रास दिला जात होता. त्याच्याकडे सतत पैशांची मागणी केली जात होती. शुक्रवारी १३ डिसेंबरला त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात येणार होते. तिथेच त्यांना एक हजार रुपये द्यावे लागतील असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. याच दरम्यान त्याने त्यांना एक मोबाईल क्रमांक दिला होता. या मोबाईलवर त्यांनी ऑनलाईन एक हजार रुपये ट्रॉन्स्फर केले होते. पैसे पाठविल्याचा स्क्रिनशॉप आणि मॅसेज त्याने पाठवून त्याची खात्री करुन घेतली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पैसे मिळाल्याबाबत ओके असा मॅसेज पाठवून दिला होता. त्यानंतर त्याने त्याला पुन्हा व्हॉटअप कॉल करुन दहा हजाराची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर शुक्रवारी १३ डिसेंबरला संबंधित पोलिसांकडून लाचेची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी पोलीस शिपाई राहुल गरड यांनी दहा हजाराची लाचेची मागणी करुन ती लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे शनिवारी या अधिकार्‍यांनी तिथे सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजाराची लाचेची रक्कम घेताना पोलीस शिपाई राहुल गरड याला या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. ही लाच घेतल्यानंतर त्याने मोबाईलवर वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांना संपर्क साधून लाचेची रक्कम मिळाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत निवृत्ती कन्नेवाड याला पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध कलम ७ भारतीय भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

अटकेनंतर दोघांनाही रविवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर कारागृहातील आरोपींच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी केली आहे का, त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत का याचा तपास करत आहेत. दरम्यान या कारवाईनंतर निवृत्ती कन्नेवाड यांच्या राहत्या घरी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा तपशील मात्र समजू शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page