फ्लॅटच्या आमिषाने विधवा महिल, वयोवृद्धासह तिघांची फसवणुक

तिन्ही गुन्ह्यांत चौघांकडून 57 लाख 55 हजाराचा अपहार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – फ्लॅटच्या आमिषाने एका विधवा महिला, वयोवृद्धासह तिघांची चारजणांच्या टोळीने फसवणुक केल्याची घटना अंधेरी आणि भायखळा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार भामट्याविरुद्ध भायखळा पोलिसांनी दोन तर वर्सोवा पोलिसांनी एक अशा तीन अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या चारही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. यातील एका आरोपीला अशाच एका गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती तर दुसर्‍या आरोपीने विधवा महिलेला शासकीय कोट्यातील फ्लॅटसह तिच्या मुलाला रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला विधवा असून ती तिच्या पाच मुलांसोबत घोडपदेव परिसरात राहते. तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पूर्वी ती गोरेगाव येथे राहत असून तिथेच तिची मोहम्मद इसाक इनायतुल्ला खान याच्याशी ओळख झाली होती. शासनाची विधवा महिलांसाठी एक योजना असून योजनेतंर्गत तिला शासकीय कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे त्याने आश्वासन दिले होते. त्याचे वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांशी चांगले संबंध आहे. तिच्यासह घरासह तिच्या मुलाला रेल्वेत नोकरी देण्याचेही त्याने तिला आमिष दाखविले होते. त्यासाठी तिने घरासाठी तिचा अर्ज भरुन घेतला होता. घरासह मुलाच्या नोकरीसाठी तिने त्याला टप्याटप्याने 21 लाख 55 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला घराचा ताबा दिला नाही किंवा मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून दिली नाही. विचारणा केल्यानंतर त्याने तुम्ही पैसे भरण्यासाठी उशिर केला. तुमच्या चुकीमुळे सर्व पैसे बुडाले आहे. त्यामुळे तिला आता शासकीय कोट्यातून घर किंवा तिच्या मुलाला नोकरी मिळणार नाही असे सांगितले. त्यानंतर तो तिला सतत टाळण्याचा प्रयत्न करु लागला होता. मोहम्मद इसाकने शासकीय कोट्यातील घरासह मुलाला नोकरीच्या आमिषाने तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद इसाकने घरासह नोकरीच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अशीच दुसरी घटना भायखळा परिसरात घडली. सचिन भाऊ पाटील हे अंधेरी परिसरात राहत असून ते सुरक्षारक्षक मंडळात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांची आई, मोठा भाऊ हे घोडपदेव येथे राहतात. 2011 रोजी ते सर्वजण तिथे राहत असल्याने त्यांची खाजगी ब्रोकर दत्ताराम विष्णू खाडे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्यांना त्याची म्हाडामध्ये चांगली ओळख असून त्यांना गिरणी कामगारांना सोडतीमध्ये वाटप करण्यात आलेले म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. ते स्वत नवीन फ्लॅटच्या शोधात होते. त्यात दत्तारामने त्यांना म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यास होकार दिला होता. यावेळी त्याने त्यांना सोपान विठोबा कुंभार यांना वाटप करण्यात आलेला फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून 21 लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा तसेच फ्लॅटचे कागदपत्रे दिली नाही. 2016 रोजी त्यांना सोपान कुंभार यांनी त्यांचा फ्लॅट दुसर्‍या व्यक्तींना विक्री केला होता. हा प्रकार समजताच त्यांनी दत्ताराम खाडेकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्याने पैसे न देता पलायन केले होते. याच दरम्यान त्याला अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यांत भायखळा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच त्याने त्यांना दुसरा फ्लॅट देतो असे सांगितले, मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्यांनी दत्तारामविरुद्ध भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तिसर्‍या गुन्ह्यांत विनायक नाईक आणि दक्षीत टिपे या दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फ्लॅटसाठी पंधरा लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याचा आरोप आहे. 66 वर्षांचे अरुण विठ्ठल गोमोजी हे अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असून ते बॉम्बे पोर्ट विभागातून निवृत्त झाले आहेत. यातील दक्षीत हा त्यांचा नातेवाई असून विनायक हा त्याचा मित्र आहे. 2017 साली त्याने विनायक हा वर्सोवा, बंदर रोड, पांडुरंग निवास, टोंबरी हाऊस येथे एका इमारतीचे बांधकाम करत असून तिथेच त्यांना स्वस्तात 350 चौ. फुटाचा फ्लॅट देतो असे सांगितले होते. याच फ्लॅटसाठी त्यांनी अरुण गोमोजी यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा न देता त्यांनी दिलेल्या पंधरा लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वर्सोवा पोलिसात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page