ऑनलाईन फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांत साडेसतरा लाखांचा गंडा
सांताक्रुज-सायन येथे तिघांची अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या तीन व्यक्तींची अज्ञात अज्ञात सायबर ठगांनी सुमारे साडेसतरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार सांताक्रुज आणि सायन परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी दोन तर सायन पोलिसांनी एक फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
प्रणय नंदकुमार जाधव हे सांताक्रुज येथे राहत असून ते अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. नोकरीसोबत ते नियमित शेअर-स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करत होते. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी घरी असताना शेअर मार्केटची माहिती घेताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअपमध्ये सामिल करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये त्यांच्यासह इतर काही सभासद होते. या ग्रुपचा ऍडमिन राजीव बत्रा हा सभासदांना शेअरमार्केटसंदर्भात कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल याबाबत माहिती देत होता. त्याने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यासाठी त्यांना एक ऍप पाठविला होता. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याने त्याने त्याच्यावर विश्वास ठेवून विविध शेअरसाठी सव्वाआठ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीला त्यांना मूळ रक्कमेसह प्रॉफिटची सुमारे २६ लाख रुपये झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी प्रॉफिटची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ही रक्कम काढता येत नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर राजीव बत्रा व त्याचा सहाय्यक विविध टॅक्सच्या नावाने पैसे भरण्यास सांगत होता. मात्र त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार सय्यद जरगाम अब्बास हे मौलाना असून ते सांताक्रुज येथे राहतात. ते मिलन जंक्शनजवळील एका मशिदीमध्ये नमाज पठण करणे आणि धार्मिक कार्य करतात. ३ फेब्रुवारीला ते त्यांच्याघरी होते. यावेळी त्यांना फेसबुकवर अब्बास जाफारी अब्बास नावाच्या एका व्यक्तीने त्यांचा मामाचा मुलगा नबील खान या नावाने फे्रंड रिक्वेस्ट पाठविली होती. कुठलीही शहानिशा न करता त्यांनी ती रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर त्याने त्यांच्याशी चॅट सुरु केले होते. चॅटदरम्यान त्याने त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला होता. काही वेळानंतर त्याने त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स मागून त्यांच्या खात्यात काही रक्कम पाठवतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याला त्यांच्या बँक खात्याचे सर्व डिटेल्स शेअर केले होते. त्यानंतर त्याने त्यांच्या बॅक खात्यात ७ लाख ८५ हजार ७०० रुपये पाठविल्याचे सांगून त्यांचा एक स्क्रिनशॉट पाठविले होते. काही वेळानंतर त्याने त्यांना फोन करुन तो इमिग्रेशन कार्यालयात आहे. त्याच्या व्हिसाची मुदत संपली आहे. प्रकरण लवकर मिटविले नाहीतर त्याला पंधरा वर्षांचा कारावास होऊ शकतो. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे पैसे पाठविण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला ४ लाख ९१ हजार ९५० रुपये पाठविले होते. रात्री उशिरा त्याने त्यांना पुन्हा कॉल करुन मेडीकल फिटनेससाठी पैशांची मागणी केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांनी त्याच्या मित्राला ही माहिती सांगितली. त्याने त्यांची फसवणुक झाल्याचे सांगून पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. अज्ञात सायबर ठगाने त्यांचा मामाचा मुलगा असल्याची बतावणी करुन त्यांची ही फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होत.
निरज संदीप चिटणीस हा सायन येथे राहतो तो सल्लागार म्हणून काम करतो. २८ ऑगस्टला तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्याचे क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्याकडून बँक खात्याची डिटेल्स प्राप्त करुन त्याने त्याच्या क्रेडिट कार्डवरुन ४ लाख ५४ हजाराचा ऑनलाईन व्यवहार केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्याने सायन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तिन्ही तक्रारीनंतर सांताक्रुज आणि सायन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.