मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका 26 वर्षांच्या रिक्षाचालक तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सायबअली पठाण आणि नितू करण सिंग यांचा समावेश आहे. मुलुंड आणि देवनार परिसरात दोन्ही अपघात झाले असून अपघातानींतर दोन्ही आरोपी चालकाने घटनास्थळाहून पलायन केले होते. याप्रकरणी देवनार आणि नवघर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपी चालकांचा शोध सुरु केला आहे.
पहिला अपघात बुधवारी 29 ऑक्टोंबरला रात्री दोन वाजता गोवंडीतील बैंगनवाडी सिग्नल, मानखुर्दकडे जाणार्या वाहिनीवरील आक्सा हॉटेलसमोर झाला. अफसाना गुलसार अली सय्यद ही महिला गोवंडीतील शिवाजीनगर, बैंगनवाडीत राहते. तिचे पती रिक्षाचालक म्हणून काम करतात. गेल्या दिड वर्षांपासून तिचा भााऊ सायबअली हा तिच्यासोबत राहत असून तोदेखील रिक्षा चालवितो. सहा वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झालेला आहे. बुधवारी 29 ऑक्टोंबरला सकाळी अकरा वाजता तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामासाठी निघून गेला होता. मात्र रात्री दिड वाजेपर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे तिने त्याच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. चौकशीदरम्यान तिला सायबअलीचा अपघात झाल्याचे समजले. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे तिला तिच्या भावाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
चौकशीदरम्यान सायबअली हा त्याचा मित्र सुरज काळे या मित्रासोबत मानखुर्द येथील आक्सा हॉटेलसमोरुन घरी जाण्यासाठी येत होते. यावेळी सिग्नल क्रॉस करताना एका अज्ञात बाईकस्वाराने सायबअलीला जोरात धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला त्याने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघातानंतर बाईकस्वार बाईक तिथेच टाकून पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अफसाना सय्यद हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दुसरा अपघात बुधवारी रात्री अडीच ते पावणेतीनच्या सुमारास मुलुंड येथील ऐरोली ब्रिज, नॉर्थ बॉण्डजवळ झाला. बुधवारी रात्री सहाय्यक फौजदार अनिल कुंभार, पोलीस हवालदार पाटील, शेडगे, महिला पोलीस शिपाई शेटे, चालक पोलीस हवालदार आव्हाड हे गस्त घालत होते. यावेळी या पथकाला ऐरोली ब्रिजवर अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे पोलीस पथक घटनास्थळी गेले होते. तिथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृत व्यक्तीकडे पोलिसांना एक आधारकार्ड सापडले. त्यावरुन त्याचे नाव नितू करण सिंग असल्याचे उघडकीस आले. नितू हा उत्तरप्रदेशच्या मेरठचा रहिवाशी आहे. त्याच्या मोबाईलवरुन पोलिसांनी परमिंदर पनवार याला संपर्क साधला असता तो त्याचा मेहुणा असल्याचे उघडकीस आले.
बुधवारी रात्री नितू हा रस्ता क्रॉस करत होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती. त्याला वैद्यकीय उपचारासह पोलिसांना अपघाताची माहिती न देता तो पळून गेला होता. याप्रकरणी अनिल कुंभार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या चालकाच्या वाहनाचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमाकांवरुन त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.