चौदा-सतरा वर्षांच्या दोन अल्वयीन मुलींचा विनयभंग
सावत्र पित्यासह पित्याच्या परिचिताविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कांजूरमार्ग येथे चौदा वर्षांच्या मुलीचा तिच्याच सावत्र पित्याने तर चेंबूर येथे सतरा वर्षांच्या मुलीचा पाठलाग करुन अश्लील इशारे केल्याप्रकरणी पित्याच्या परिचिताविरुद्ध पार्कसाईट आणि आरसीएफ पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आहेत. त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
14 वर्षांची बळीत मुलगी ही भांडुप येथे राहत असून सध्या शिक्षण घेते. 36 वर्षांचा आरोपी तिचा सावत्र पिता आहे. 22 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत बळीत मुलगी कांजूरमार्ग येथे असताना तिच्यावर तिच्याच सावत्र पित्याने अनेकदा झोपेत असताना अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. झोपेत असताना तिने सुरुवातीला काही प्रकार समजला नव्हता. मात्र डिसेंबर 2024 रोजी ती रात्रीच्या वेळेस झोपेत असताना आरोपीने पुन्हा तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिला जाग आल्याने तिला तिचे सावत्र पिताच तिच्याशी अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला धक्काच बसला होता.
गेल्या तीन वर्षांपासून तिचे सावत्र पिताच तिच्यावर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होते. मात्र बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र अलीकडेच तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या सावत्र पित्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आरोपी सावत्र पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती.
दुसरी घटना चेंबूर परिसरात घडली. सतरा वर्षांची बळीत मुलगी शिक्षण घेत असून सध्या चेंबूर परिसरात राहते. 31 वर्षांचा आरोपी तिच्या वडिलांच्या परिचित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो सतत तिचा पाठलाग करत होता. बुधवारी 8 ऑक्टोंबरला रात्री अकरा वाजता त्याने तिला अश्लील इशारे करुन स्वतजवळ बोलण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने ती घाबरली आणि घरी निघून आली. त्यानंतर तिने आरसीएफ पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.