लाच घेणार्‍या दोन्ही पोलीस अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गुन्ह्यांत मदतीसह विरोधकावर कारवाईसाठी लाचेची मागणी करुन दोन लाख तीस हजार रुपयांची लाच घेताना वडाळा टी टी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्यानंतर आता या दोन्ही अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. 30 ऑक्टोंबरला पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी त्यांच्याविरुद्ध बडतर्फीचे आदेश जारी केले होते. या आदेशामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. बडतर्फीचे आदेश जारी करुन पोलीस आयुक्तांनी पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना एक प्रकारे अशा कृत्यांना कोणालाही माफी मिळणार नाही असे स्पष्ट संकेत दिले आहे.

यातील तक्रारदाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे एका व्यक्तीसोबत समाजाच्या हॉलवरुन वाद सुरु होता. या वादातून दोन्ही लोकांनी एकमेकांविरुद्ध तक्रार केली होती. मात्र तक्रारदाराची तक्रार न घेता विरोधकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तक्रारदाराच्या मुलीला आरोपी न करता तिला मदत करणे तसेच विरोधकावर कारवाई करण्यासाठी तपास अधिकारी उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांनी त्यांच्याकडे साडेपाच लाखांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि स्वतसाठी पन्नास रुपयांची मागणी केली होती.

मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी वरिष्ठांना चार लाख रुपये आणि त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. यावेळी त्यांनी त्याच्याकडून आगाऊ वीस हजार रुपये घेतले होते. उर्वरित लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वडाळा टी टी पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. 26 सप्टेंबर 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना दोन लाखांचा पहिला तर उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना तीस हजाराचा दुसरा हप्ता घेताना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. पोलीस ठाण्यात झालेल्या या कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर चंद्रकांत सरोदे आणि राहुल वाघमोडे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. दुसरीकडे पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाला लाचप्रकरणी अटक झाल्याने त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत या दोघांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली होती. त्याचाच एक भाग म्हणून 30 ऑक्टोंबरला त्यांच्याविरुद्ध बडतफीचे आदेश जारी करण्यात आले होते. या आदेशाची प्रत या दोघांनाही त्यांच्या राहत्या घरी पाठविण्यात आली आहे.

बडतर्फीची कारवाई झाल्याने या दोन्ही अधिकार्‍यांना आता कुठलीही शासकीय मदतीसह निलबंनाच्या कारवाईदरम्यान मिळणारे फायदे मिळणार नाही. त्यांना कोर्टात दाद मागता येईल, मात्र त्याचा फारशा फायदा होईल असे वाटत नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले. लाच प्रकरणी पोलीस आयुक्तांनी थेट बडतर्फीची कारवाई केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलीस दलात अशा प्रकारे बेशिस्तपणा चालणार नाही, पोलीस दलाची बदनामी होईल अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गय केली जाणार नाही असे संकेतच पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page