कौटुंबिक वाद भावाला सांगितला म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक
आरोपी पतीसह एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 नोव्हेंबर 2025
मुंबई, – जेवण बनविता येत नाही तसेच कौटुंबिक वादातून सतत टोमणे मारुन एका 25 वर्षांच्या महिलेची तिच्याच सासरच्या मंडळीने मानसिक व शारीरिक शोषण केला, घरातील कौटुंबिक वादाची माहिती भावाला सांगितली म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन आरोपी पतीसह एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि मुस्लिम महिला कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद फय्याज अब्दुल अलीम सिद्धीकी, परवीन अब्दुल अलीम सिद्धीकी, अब्दुल अलीम सिद्धीकी आणि जैनब अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
25 वर्षांची तक्रारदार महिला ही गोवंडीतील शिवाजीनगरची रहिवाशी असून तिथे ती तिच्या कुटुंबियांसोबत राहते. मोहम्मद फय्याज हा तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असून त्यांनी त्यांच्याकडे मोहम्मद फय्याजसाठी त्यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीनंतर नोव्हेंबर 2023 रोजी तिचे मोहम्मद फैय्याजसोबत उत्तरप्रदेशातील गावी लग्न झाले होते. लग्नात तिच्या कुटुंबियांनी त्याला एक बाईक, सोन्याचे दागिने आणि इतर काही वस्तू दिले होते. लग्नानंतर ती तिच्या गोवंडीतील बैंगनवाडीतील सासरी आली होती. लग्नाच्या अवघ्या तीन ते चार महिन्यांत तिच्या सासरच्या मंडळीने तिला माहेरी जाण्यास विरोध सुरु केला होता. तिने माहेरी जाण्यासाठी विनंती केल्यानंतर त्यांनी तिला कायमचे जायचे असेल तर जा, एकदा घरातून गेली की परत येऊ नकोस अशी धमकी दिली होती. त्यानंतर तिचे सासरचे मंडळी क्षुल्लक कारणावरुन तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होते.
जेवण बनविता येत नाही तसेच क्षुल्लक कामावरुन तिला टोमणे मारले जात होते. सप्टेंबर महिन्यांत तिला ती गरोदर असल्याचे समजले होते. या कालावधीतही तिचे सासरचे मंडळी तिचा मानसिक शोषण करत होते. तिला वेळेवर जेवण देत नव्हते. सतत कामावरुन तिला टोमणे मारले जात होते. तिला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरचे कोणीही तिला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले नाही. सतत होणार्या छळाला कंटाळून तिने तिच्या पतीकडे विचारणा केली असता त्याने तिला घरकामासाठी आणले आहे, काम कर नाहीतर तुझ्या घरी निघून जा असा सल्ला दिला. मी दुसरे लग्न करणार असून त्या मुलीकडून जास्तीत जास्त हुंडा मिळेल असे सांगितले. त्यानतर तोदेखील तिचा मानसिक शोषण करुन तिला मारहाण करत होता. 23 सप्टेंबरला त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता.
या वादानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या भावाला सांगितला होती. ही माहिती समजताच तिचा पती प्रचंड संतप्त झाला होता. रागाच्या भरात त्याने तिला तीन वेळा तोंडी तलाक तलाक तलाक बोलून बेकायदेशीर तलाक दिला. या घटनेनंतर तिच्या वडिलांसह भावांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासमोर त्याने पुन्हा तीन वेळा तिहेरी ताकार बोलून तिला घटस्फोट दिला होता. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिच्या पतीसह इतर तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिचा पती मोहम्मद फय्याज, सासू परवीन, सासरे अब्दुल सिद्धीकी आणि नणंद जैनब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.