मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पाचशे रुपये देऊन पंधरा व सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २३ वर्षांच्या तरुणाला वाकोला पोलिसांनी अटक केली. या तरुणाला स्थानिक रहिवाशांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोळा वर्षांची तक्रारदार मुलगी सांताक्रुज येथे राहत असून आरोपी हादेखील याच परिसरात राहतो. तो एका हॉटेलमध्ये कामाला असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. ८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत आरोपीने तिचा अनेकदा पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा तो रस्त्यावरुन येता-जाता तिला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करत होता. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ही मुलगी तिच्या पंधरा वर्षांच्या मैत्रिणीसोबत जात होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने त्यांना पाचशे रुपये देण्याचा प्रयत्न करुन दोघींशी अश्लील संभाषण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार या दोन्ही मुलींकडून समजताच स्थानिक रहिवाशांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला वाकोला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी बळीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.