मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – दारु पिण्यावरुन सतत होणार्या भांडणातून आलोक दिनेश गुप्ता या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच वडिलांनी चाकूने पोटात भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सांताक्रुज परिसरात घडली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी वडिल दिनेश रामकुमार गुप्ता याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला सोमवारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पित्यानेच अल्पवयीन मुलाच्या केलेल्या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सांताक्रुज येथील वाकोला ब्रिज, दत्त मंदिर रोडच्या वाघरीवाड्यात घडली. याच परिसरातील दुर्गा माता चाळ क्रमांक दोनमध्ये आलोक हा त्याचे वडिल दिनेश, आई आणि मोठी बहिण प्रितीसोबत राहत होता. गुप्ता कुटुंबिय मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपूसन या परिसरात राहत होते. दिनेश हा काहीच कामंधदा करत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याची आई आणि आलोक हे काम करत होते. मात्र वारंवार दिनेशला समजावून त्याचे दारुचे व्यसन सुटत नव्हते. याच कारणावरुन दिनेश आणि आलोक यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. रविवारी त्याची आई नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. यावेळी आलोक हा त्याची बहिण प्रितीसोबत घरी होता. सायंकाळी साडेसात वाजता दिनेश हा नेहमीप्रमाणे दारुच्या नशेत घरी आला होता. यावेळी दारु पिण्यावरुन त्याचे दिनेशसोबत पुन्हा वाद झाले होते. या वादातून रागाच्या भरात त्याने आलोकच्या पोटात चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या आलोकला जवळच्या व्ही. एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेनंतर प्रितीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी दिनेश गुप्ताविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी दिनेशला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.