क्राईम ब्रॅचने पकडल्याची बतावणी करुन पेंटरची फसवणुक
विविध बँक खात्यात 4.59 लाख ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दुबईत पेंटर म्हणून कामाला असलेल्या मित्राला क्राईम ब्रॅचच्या अधिकार्यांनी पासपोर्टच्या गुन्ह्यांत पकडल्याचा फेसबुकवर मॅसेज पाठवून त्याच्या पेंटर मित्राची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. विविध बँक खात्यात 4 लाख 59 हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन या ठगाने तक्रारदार पेंटरची फसवणुक केली होती. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
रामलखन रामसिंहासन निशाद हा मूळचा उत्तरप्रदेशच्या गोरखपूरचा आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो त्याच्या पत्नी आणि दोन मुले आणि दोन भावासोबत सांताक्रुज परिसरात आहे. तो व्यवसायाने पेंटर असून त्याला नियमित पेंटींगचे ऑर्डर मिळतात. त्यातून त्याचा कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा मनिष निशाद नावाचा एक मित्र असून गेल्या आठ वर्षांपासून दुबई येथे पेंटर म्हणून काम करतो. अनेकदा तो त्याच्याशी संपर्कात असतो. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता त्याला फेसबुकवर मनिषचा मॅसेज आला होता. त्यात त्याने त्याला चार लाख ऐंशी हजार रुपये पाठवत असल्याचे सांगून ही रक्कम त्याला गावी आल्यानंतर परत करण्यास सांगितले होते. तो लवकरच दुबईहून त्याच्या गावी जाणार असल्याचे सांगितले.
काही वेळानंतर त्याने त्याला पुन्हा मॅसेज केा. त्यात त्याने त्याच्या पासपोर्टमध्ये काही चूक झाली असून त्याला क्राईम ब्रॅचच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याने पासपोर्ट एजंटशी संपर्क साधून त्याचे पासपोर्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याने किरण नावाच्या एका पासपोर्ट एजंटला कॉल करुन त्याचे पासपोर्ट रिन्यू केले होते. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने तो क्राईम ब्रॅचचा अधिकारी असल्याचे सांगून त्याच्याकडून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर त्याच्या मित्राला पाच वर्षांची शिक्षा होईल अशी भीती घातली होती. त्यामुळे त्याने त्याला पासपोर्टसह मित्रावर कारवाई होऊ नये म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यात 4 लाख 59 हजार 999 रुपये ट्रान्स्फर केले होते.
ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्याला कोणीही संपर्क साधला नाही. मनिषला संपर्क साधल्यानंतर त्याला क्राईम ब्रॅचच्या अधिकार्यांनी पकडले नसून त्याचा पासपोर्टचा काहीही इश्यू झालेला नाही असे सांगितले. या घटनेनंतर त्याला त्याची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे निदर्शनास आले. मनिषच्या नावाने त्याला अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन पासपोर्टसह कारवाईची भीती दाखवून ही रक्कम घेतली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याने वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.