अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी
सोळा वर्षांच्या मुलाला ब्लॅकमेल करुन मित्राकडून पैशांची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – अज्ञात मुलीशी केलेल्या व्हिडीओ कॉलचे रेकॉडिंग करुन त्यांच्यातील अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलाकडे त्याच्याच मित्राने पैशांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलाने मित्राला बदनामीच्या भीतीने सुमारे एक लाखांची कॅशसहीत सोन्याचे दागिने खंडणी स्वरुपात दिले आहे. याप्रकरणी मुलाच्या डॉक्टर आईच्या तक्रारीवरुन वनराई पोलिसांनी आरोपी मित्र सुमीतविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच आरोपी मित्राची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
५६ वर्षांची तक्रारदार महिला डॉक्टर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहते. सध्या ती जोगेश्वरीतील शासकीय हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तिचे पतीही डॉक्टर असून ते एका मेडीकल कॉलेजमधये सायन्स विभागाचे प्रमुखपदी काम करतात. त्यांना एक सोळा वर्षांचा मुलगा असून त्याला एडीएचडी नावाचा एक आजार आहे. ज्यात त्याला सामान्य मुलासारखे एकाग्रता नसते, मोठे मोजमाप जमत नाही. त्याच्यावर सध्या औषधोपचार सुरु आहे. त्याचा उजवा पाय हा डाव्या पायापेक्षा लहान आहे. त्यामुळे त्याचे शिक्षण एका खाजगी शाळेत सुरु असून तिथे सामान्य मुलापेक्षा वेगळी परिक्षा होते. त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम वेगळा आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या स्वभावात प्रचंड बदल झाला होता. तो फारसा कोणाशी बोलत नव्हता, घरी जेवत नव्हता. सकाळी घरातून निघून गेल्यानंतर रात्री उशिरा घरी येत होता. तो सतत कुठल्या तरी विचारत दिसत होता. हा प्रकार विचित्र वाटल्याने तिच्या आईने त्याच्याकडे आपुकीने विचारपूस केली होती. सुरुवातीला त्याने काहीच सांगितले नाही. मात्र गुरुवारी १८ जुलैला त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याने सांगितलेली माहिती धक्कादायक होती. त्याचा सुमीत नावाचा एक मित्र आहे.
दोन महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या मोबाईलवरुन एका मुलीला हाय असा मॅसेज पाठविला होता. मॅसेज पाठविल्यानंतर सुमीतने त्याला त्या मुलीचा कॉल आल्यास तिच्याशी गप्पा मारु शकतोस असे सांगितले, मात्र त्याने तिला कॉल केला नाही. त्याच रात्री त्या मुलीने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. त्याने कॉल घेतल्यानंतर त्या मुलीने स्वतचे कपडे काढण्यास सुरुवात करुन त्याला कपडे काढण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिने त्यांच्यातील अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. ते व्हिडीओ नंतर त्याला पाठवून तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडे पैशांची मागणी करु लागली. पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याच्यासह कुटुंबियांची बदनामीची धमकी दिली होती. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि घडलेला प्रकार त्याने सुमीतला सांगितला. यावेळी सुमीतने तिला पैसे देऊन प्रकरण मिटविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या मुलीचा त्याला कॉल आला नाही. मात्र त्याने त्याचे अश्लील व्हिडीओ सुमीतला शेअर केला होते. हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता. या मुलीनंतर तो त्याच्याकडे पैशांची मागणी करु लागला. त्याला पैसे दिले नाहीतर तोच त्याचे न्यूड व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. पैसे दिले नाही त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांच्या बदनामीच्या भीतीने त्याने त्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्याची आजी दहिसर येथे राहत होती, आजी कुठे पैसे ठेवते याची त्याला माहिती होती. त्यामुळे त्याने आजीच्या घरी जाऊन सुमारे एक लाख रुपयांची कॅशसहीत अडीच तोळ्याचा सोन्याचा हार आणि चार ग्रॅमची अंगठी चोरी करुन सुमीतला दिले. पैसे आणि दागिने दिल्यानंतरही सुमीतकडून त्याला ब्लॅकमेल करुन धमकी दिली जात होती.
हा प्रकार मुलाकडून समजताच तक्रारदार महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने वनराई पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुमीतविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. लवकरच सुमीतची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्याच्याकडून दागिन्यांसह कॅश जप्त केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. धमकी देणार्या मुलीशी सुमीतचा काय संबंध आहे. त्याने तिला ब्लॅकमेल आणि पैशांची मागणी करण्यास प्रवृत्त केले का, पिडीत मुलाकडून मिळालेली काही रक्कम सुमीतने या मुलीला दिली होती का, या मुलीसह सुमीतने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.