जागेच्या वादातून झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश

वसई रेल्वे पोलिसांची कारवाई; दोन्ही आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
वसई, – कचरा वेचण्याच्या जागेच्या वादातून झालेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात वसई रेल्वे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली. अंकित राम टेनीराम आणि बबलू चन्ना रॉय अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वसई बसस्टॅण्डजवळील फुटपाथवरील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांना लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचा तिसरा ७५ वर्षांचा वयोवृद्ध सहकारी प्रकाश मोरवाल ऊर्फ चाचा याच्या सांगण्यावरुन राजेश ऊर्फ राजू मारवाडी याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी सांगितले. प्रकाश ऊर्फ चाचा याचा शोध सुरु असताना त्याचा दारुच्या नशेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे उघडकीस आले.

गेल्या शुक्रवारी पहाटे वसई रेल्वे स्थानकाजवळील ब्रिजजवळ भीषण आग लागली होती. या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीची माहिती मिळताच वसई रेल्वे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आगीत भाजलेल्या व्यक्तीचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आले होते. शवविच्छेदन अहवालानंतर प्राथमिक तपासात या व्यक्तीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान डांगे, तुंबडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अंकित आणि बबलू या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनीच प्रकाश मोरवाल ऊर्फ चाचा याच्या सांगण्यावरुन ही हत्या केल्याची कबुली दिली. तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रकाश ऊर्फ चाचा याचा शोध सुरु केला होता. याच दरम्यान त्याचा मृतदेह वालिव परिसरात पोलिसांना सापडला. प्रकाशला दारु पिण्याचे व्यसन होते. दारुच्या अतिरेक सेवनामुळे त्याला हृदयविकराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घड्याळासह चैनीवरुन मृत व्यक्तीची ओळख पटली
मृत राजू ऊर्फ राजेश हा वसई बसस्टॅण्डजवळ कचरा वेचण्याचे काम करत होता. कचरा वेचण्याच्या जागेवरुन त्याचे आरोपीसोबत वाद झाला होता. याच वादातून प्रकाश ऊर्फ चाचाने बबलू आणि अंकितच्या मदतीने राजू मारवाडीची हत्या घडवून आणली होती. घटनास्थळी पोलिसांना एक बॅग सापडली होती. तसेच राजूच्या हातातील घड्याळ आणि चैन यावरुन त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. घटनेच्या दिवशी या चौघांनी वसई येथील एका वाईन शॉपमधून दारु विकत घेतली होती. त्यानंतर ते चौघेही एकत्र बसून दारु प्यायल्याचे तपासात उघडकीस आले. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी रक्ताचे डाग सापडल्यामुळे पोलिसांना या घटनेमागे अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला होता. कुठलाही पुरावा नसताना रेल्वे पोलिसांनी तांत्रिक तपासासह सीसीटिव्ही फुटेजवरुन या हत्येचा गुन्हा उघडकीस आणून दोन्ही आरोपींना काही तासांत अटक केली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्यासह त्यांच्या पथकाचे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page