वेबसिरीजसाठी घेतलेल्या एक कोटीचा अपहार

कंपनीच्या संचालिका महिलेविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – वेबसिरीजसाठी हरियाणाच्या एका व्यावसायिकाकडून घेतलेल्या एक कोटीचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पांचाली चक्रवती या महिलेविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पांचाली ही जेली बीन इंटरटेनमेंट कंपनीची संचालिका आहे. पैशांची मागणी करणार्‍या व्यावसायिकाला तिने खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी देत गुंतवणुक केलेली रक्कम देण्यास नकार दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने पांचालीला चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले.

व्यावसायिक असलेले योगेशकुमार जगदीशचंद्रकुमार रहार हे मूळचे हरियाणाच्या गुडगाव, सेक्टर ६७ चे रहिवाशी आहेत. त्यांच्या मालकीचा अंधेरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोडवरील ओबेरॉय स्प्रिंग्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची चांपाली चक्रवर्तीशी ओळख झाली होती. तिने तिच्या मालकीची जेली बीन इंटरटेनमेंट नावाची एक कंपनी असल्याचे सांगून ती अंधेरीतील वर्सोवा, आराम नगर पार्ट दोनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. तिने कब तक जवानी छुपाओगी राणी नावाचा एक वेबसिरीजची निर्मिती सुरु केली होती. या वेबसिरीजमध्ये त्यांनी गुंतवणुक केल्यास तिने त्यांना पार्टनरशीपसह ५० टक्के परतावा देण्याचे आश्‍वासन दिले होते. सुरुवातीला त्यांनी वेबसिरीजमध्ये गुंतवणुक करण्यास नकार दिला होता. मात्र पांचालीच्या आग्रहाखातर त्यांनी त्यात गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती. गुंतवणुकीपूर्वी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात तिने वेबसिरीजमध्ये त्यांची निर्माता म्हणून उल्लेख करणार असल्याचे तसेच त्यातून मिळणार्‍या प्रॉफ्रिटमधून ५० टक्के शेअर असल्याचे नमूद केले होते. या करारानंतर डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत त्यांनी तिला टप्याटप्याने एक कोटी रुपये कॅश आणि धनादेशद्वारे दिले होते.

मात्र एक वर्ष उलटूनही तिने वेबसिरीजचे काम सुरु नव्हते. वेबसिरीजसाठी दिलेल्या पैशांचा तिने स्वतच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता फसवणुक केली होती. त्यांच्यातील कराराचा भंग केला होता. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी तिने पैसे देण्यास नकार देत त्यांना खोट्यात अडकाविण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पांचाली चक्रवर्ती हिच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पांचालीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तिने वेबसिरीजच्या नावाने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page