४५ वर्षांच्या व्यक्तीवर हल्ला करणार्या मारेकर्यांना अटक
गांजा दिला नाही म्हणून हल्ला केल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – अंधेरीतील राहत्या घरात घुसून दिपक सुभाष राठोड या ४५ वर्षांच्या व्यक्तीवर बांबूसह तिक्ष्ण हत्याराने वार करुन हल्ला करणार्या दोन्ही मारेकर्यांना अटक करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले आहे. शुभनकुमार अजयकुमार आणि शंकर तायन्ना भंडारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही जखमी दिपकचे जवळचे मित्र आहे. गांजा दिला नाही म्हणून या दोघांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांच्याकडून गुन्ह्यांत मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड, शास्त्रीनगर चाळीत शीतल दिपक राठोड ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. दिपक हे तिचे वडिल असून ते तिच्या घरापासून काही अंतरावर एकटेच राहतात. सोमवारी १० जून शीतल ही तिच्या परिचित लोकांसोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री घरी आल्यानंतर तिला तिच्या वडिलांवर अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे समजले होते. त्यांच्या छातीला, पाठीला, हाताला, दंडाला तिक्ष्ण हत्याराने भोसकल्याच्या अनेक जखमा होत्या. रक्तबंबाळ झालेल्या दिपकला स्थानिक रहिवाशांनी तातडीने अंजुमन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी गेले होते. यावेळी शीतल राठोडकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. काही प्रत्यक्षदर्शीनी सुभाष राठोड यांच्या घरातून एका व्यक्तीला घाईघाईने बाहेर जाताना पाहिले होते, तो नंतर एका रिक्षातून बसून निघून गेला होता.
हाच धागा पकडून पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाने हल्ल्यानंतर पळून गेलेल्या शुभनकुमार अजयकुमार आणि शंकर भंडारी या दोघांनाही मढ परिसरातून अटक केली. त्यांच्या चौकशीत दिपकसह दोन्ही आरोपींना गांजा सेवन करण्याचे व्यसन होते, दिपक हा एकटाच राहत असल्याने ते दोघेही त्याच्याकडे गांजा सेवन करण्यासाठी येत होते. १० जूनला त्यांनी त्याच्याकडे गांजाची मागणी केली, मात्र त्याने गांजा देण्यास नकार देताना त्यांना गांजावरुन खडे बोल सुनावले होते. त्याचा राग आल्याने या दोघांनी त्याच्यावर आधी बांबूने आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. जखमी अवस्थेत त्याला बाथमध्ये टाकून ते दोघेही रिक्षातून पळून गेले होते. या कबुलीनंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांत बांबू आणि चाकू पोलिसांनी हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले.