रिक्षाचालकावर हल्ला करुन लुटमार करणार्या त्रिकुटास अटक
अटक आरोपींच्या अटकेने इतर गुन्ह्यांची उकल होणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – रिक्षाचालकावर हल्ला करुन लुटमार करुन पळून गेलेल्या एका त्रिकुटाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. सुनित अनिलकुमार तिवारी, विकास ईश्वर खारवा आणि राहुल अशोक राणा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अंधेरी-जोगेश्वरीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा त्यांचा एक सहकारी पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. अटक तिन्ही आरोपींच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोहम्मद सलीम अकबर खान हे जोगेश्वरी परिसरात राहत असून रिक्षाचालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री ते एका प्रवाशाला जोगेश्वरी येथून वर्सोवा, चायकॉफी परिसरात घेऊन आले होते. रात्री उशिरा एक वाजता ते दुसर्या भाड्याची वाट पाहत होते. याच दरम्यान तिथे बाईकवरुन चारजण आले. काही कळण्यापूर्वीच या चौघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील कॅश आणि मोबाईल चोरीचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यातील एकाने त्यांच्यावर चाकूने वार केले होते. त्यात त्यांच्या हाताला आणि दंडाला दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांनी आरडाओरड सुरु केली होती. त्यामुळे तिथे लोक जमा झाली होती. यावेळी ते चौघेही त्यांच्याकडील मोबाईल आणि दिड हजाराची कॅश घेऊन बाईकवरुन पळून गेले होते. घडलेला प्रकार नंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध गंभीर दुखापतीसह रॉबरीचा गुन्हा नोंद केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश गुन्हे पथकाला दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्यूजंय हिरेमठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन शिर्के, पोलीस उपनिरीक्षक नागेश मिसाळ, जाधव, उगळे, पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस हवालदार महाडेश्वर, पवार, पोलीस शिपाई गोसावी, रकटे, थोरात, भोईर, ईनामदार, साबळे, पठाण, घाडगे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे सुनित तिवारी, विकास खारवा आणि राहुल राणा असल्याचे उघडकीस आले. यातील राहुल हा अंधेरी तर इतर दोघेही जोगेश्वरी परिसरात राहतात. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून मोबाईल आणि कॅश लवकरच हस्तगत केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले.