लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील बोगस जामिनदारांना अटक

बोगस कागदपत्रे बनविणार्‍या आरोपीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मे 2025
मुंबई, – लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपीला जामिनदार म्हणून राहताना बोगस कागदपत्रे सादर करुन विक्रोळी कोर्टाची फसवणुक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय नरेश राव, अजिनाथ उत्तम पगारे आणि नलावडे अशी या तिघांची नावे असून गुन्हा दाखल होताच अजय आणि अजिनाथ या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपासासह दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी विक्रोळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले.

रविंद्र हरिभाऊ घुगे हे पोलीस शिपाई असून ते टिळकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सध्या त्यांची नेमणूक विक्रोळीतील लोकल कोर्टात कोर्ट कारकून म्हणून आहे. जानेवारी महिन्यांत साजिद ऊर्फ अख्लाख नफिस खान या 21 वर्षांच्या तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच साजिदला टिळकनगर पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी विक्रोळीतील लोकल कोर्टात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. यावेळी त्याच्या वकिलांना दोन व्यक्तींना जामिनदार म्हणून त्यांचे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर साजिदची जामिनावर सुटका झाली होती. या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली होती. त्यात जामिनदारांनी कोर्टात सादर केलेले कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले. तपासात अजय राव या जामिनदाराने जयप्रकाश उमाशंकर गौड या नावाने बोगस कागदपत्रे सादर केली होती. त्याच्या चौकशीत त्याला ते बोगस कागदपत्रे नलावडे नावाच्या व्यक्तीने बनवून दिले होते. जामिनदार महणून कोर्टात हजर राहण्यासाठी त्याला दोन हजार रुपये देण्यात आले होते. अशाच प्रकारे अजिनाथ पगारे याचे रवि दत्तू गवळी या नावाने बोगस कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आले होते. त्यालाही जामिनदार म्हणून कोर्टात हजर राहण्यासाठी दोन हजार रुपये देण्यात आले होते. त्याचे बोगस कागदपत्रेही नलावडे नावाच्या व्यक्तीने बनविले होते.

हा प्रकार उघडकीस येताच रविंद्र घुगे यांच्या तक्रार अर्जावरुन टिळकनगर पोलिसांनी अजय राव, अजिनाथ पगारे आणि नलावडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसाठी बोगस दस्तावेज सादर करुन कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अजय राव आणि अजिनाथ पगारे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा विक्रोळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून या गुन्ह्यांचे कागदपत्रांसह दोन्ही आरोपींना विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page