मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून घरात प्रवेश करुन दोन अज्ञात व्यक्तीने एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या मोलकरणीचे हातपाय बांधून कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा विलेपार्ले पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
दत्ताराम गोपाळ डिचवळकर हे ६० वर्षांचे प्रॉपटी एजंट त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथील सुभाष रोड, समर्थ निवास इमारतीच्या तळमजल्यावर राहतात. त्यांची आई वयोवृद्ध असल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी त्यांची मोलकरीण त्यांच्यासोबत राहत होती. तिला ऐकण्यास कमी येते तर तिला स्पष्ट बोलता येत नाही. रविवारी त्यांच्या मुलीकडे कार्यक्रम असल्याने ते विलेपार्ले येथे कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात त्यांची आई राधाबाई (८५) आणि मोलकरीण संगीता सुभाष काळकर (४४) या दोघीच होत्या.
दुपारी अडीच वाजता ते कार्यक्रम संपल्यानंतर घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांचा फ्लॅट उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना त्यांची आई आणि मोलकरणीच्या हातपाय बांधलेले आणि तोंड सेलोटेपने चिटकवल्याचे दिसून आले. त्यांची सुटका केल्यानंतर त्यांनी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या घरी दोन तरुण आले होते. या दोघांनी घरात जबदस्तीने प्रवेश करुन या दोघींनाही बांधून ठेवले. त्यांच्या तोंडाला सेलोटेप लावले. त्यानंतर कपाटातील लॉक तोडून ड्राव्हरमधील विविध सोन्याचे दागिने आणि १ लाख ५ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या नोटा असा ७ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
या घटनेनंतर त्यांनी विलेपार्ले पोलिसांना हा प्रकार सांगितला. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दत्ताराम डिचवळकर यांच्यासह त्यांची आई राधाबाई आणि मोलकरीण संगीता यांची जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.