मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपर अपघातात हसनैन जाहिर हुसैन भाटकर या २९ वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी डंपरचालकाने घटनास्थळाहून पलायन केले होते. त्याच्याविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
जाकीर हुसैन अब्दुल रज्जाक भाटकर हे शिवडीतील टी. बी हॉस्पिटलजवळील ममता एसआरए इमारतीमध्ये राहत असून वडाळा येथील आरटीओमध्ये वाहनांचे पेपर बनविण्याचे काम करतात. मृत हसनैन हा त्यांचा मुलगा असून तो वडाळा येथील झोमॉटो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता तो वडाळा येथील किडवाई नगर, पोस्ट ऑफिससमोरील चार रोडवरुन जात होता. यावेळी वडाळा रेल्वे स्थानकाच्या दिशेने भरवेगात जाणार्या एका मनपाच्या डंपरने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळाहून पलायन केले होते. अपघाताची माहिती मिळताच रफि किडवाई मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जाकिर हुसैन भाटकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. डंपरचालक पळून गेला तरी डंपरचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला होता. या क्रमाकांवरुन पळून गेलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.