मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – पतीच्या हत्येच्या धमकीसह मित्राच्या वाढदिवसासाठी कपडे विक्री करणार्या एका महिलेला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन वडाळा टी टी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत सत्या रविचंद्र देवेंद्र या २४ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. सत्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तेराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याचे दोन सहकारी स्नेहेश मुथ्यूलिंगम ऊर्फ तंबी आणि वसीम आयुब खान यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३२ वर्षांची तक्रारदार महिला ही सायन-कोळीवाडा परिसरात राहत असून तिचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. याच परिसरात सत्यासह इतर दोन्ही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. तिन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांची परिसरात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही पोलिसांत तक्रार करत नाही. २९ डिसेंबरला रात्री उशिरा सत्या, स्नेहेश आणि वसीम हे तिघेही तिच्या घरी गेले होते. त्यांनी तिच्याकडे मित्राच्या वाढदिवसासाठी दहा हजाराच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर तिच्या पतीच्या हत्येची धमकी त्यांनी तिला दिली होती. त्यामुळे तिने त्यांना एक हजार रुपये दिले होते.
रात्री उशिरा तीन वाजता ते तिथे पुन्हा आले होते. त्यांनी पुन्हा तिच्याकडे खंडणीची मागणी केली होती. तिने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगताच त्यांनी तिला बेदम मारहाण केली होती. यावेळी तिथे स्थानिक रहिवाशी जमा झाले होते. त्यांना जिवे मारणची धमकी देऊन त्यांनी तिथे पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेने तक्रारदार महिला प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार वडाळा टी टी पोलिसांना सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तिन्ही आरोपीविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे, मारहाण करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सत्याला पोलिसांनी वडाळा येथून अटक केली. सत्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कफ परेड, वडाळा टी टी पोलीस ठाण्यात रॉबरीसह घरफोडी, मारहण करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, गंभीर दुखापत करुन लुटमार करणे आदी तेरा गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचे दोन्ही सहकारी स्नेहेश आणि वसीम हे पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.