प्रॉपटीसाठी दोन कोटीच्या साडेतीन किलोच्या सोन्याचा अपहार
एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या रियल इस्टेट एजंटला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२४
मुंबई, – वरळीतील एक मोकळा प्लॉट विकसित करण्यासाठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन कोटी रुपयांच्या साडेतीन किलो सोन्याचा अपहार करुन एका वयोवृद्ध रियल इस्टेट डेव्हलपमेंट व्यावसायिकाची फसवणुक करणार्या एका वॉण्टेड रियल इस्टेट एजंटला गजाआड करण्यात अखेर वरळी पोलिसांना यश आले आहे. धिरेंद्र चंद्रप्रकाश शुक्ला असे या आरोपी इस्टेट एजंटचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो गेल्या एक वर्षांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे.
७२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कैलास केदारनाथ अग्रवाल हे वरळी परिसरात राहतात. त्यांचा रियल इस्टेट डेव्हल्पमेंटचा व्यवसाय असून त्यांची स्वतची अविघ्न ग्रुप नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत त्यांच्यासह त्यांचा मुलगा निशांत अग्रवाल हे प्रमुख संचालक म्हणून काम करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची धिरेंद्र शुक्लाशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्यांना तो रियल इस्टेट एजंट असून त्याचा या क्षेत्रात त्याचा दांडगा अनुभव असल्याचे सांगितले होते. मुंबईतील वेगवेगळ्या प्रॉपटी विकासकाना मिळवून देऊन त्याचा विकास करण्यासाठी आपण मदत करतो. इतकेच नव्हे तर वरळी, दादर आणि प्रभादेवी येथे अनेक प्रॉपटीचे व्यवहार केल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्यांना वरळीतील सी फेस तसेच हार्कनेस रोडवरील काही प्रॉपटीची माहिती देत त्यांना ती प्रॉपटी विकसित करण्यासाठी मिळवून देतो अस सांगितले. त्यातील वरळी सी फेस येथील आर. जी थदानी रोड, वरळी इस्टेट प्लॉट, स्किम क्रमांक ५८ ची जागा दाखविल्यानंतर कैलास अग्रवाल यांना ही प्रॉपटी आवडली होती. त्यामुळे त्यांनी त्याला ती प्रॉपटी मिळवून देण्यास सांगितले होते. यावेळी त्याने या प्रॉपटीच्या मालकाशी त्याचे घनिष्ठ संबंध असून त्याचे काही कागदपत्रे त्यांना दाखविले होते. तसेच त्यांच्यासोबत त्यांची मिटींग घडवून आणून व्यवहार पूर्ण करतो असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना ही प्रॉपटी १५० ते १६० कोटीची असून त्यासाठी त्यासाठी त्यांच्याकडे दोन कोटीची मागणी केली.
दोन महिन्यानंतर तो पुन्हा त्यांच्याकडे आला. प्रॉपटीचा मालक विदेशात जाणार असून त्यांची मिटींग घडवून आणतो असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करु लागला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला दोन कोटीचे साडेतीन किलो सोने दिले होते. लवकरच मिटींग घडवून आणतो असे सांगून तो निघून गेला. काही दिवसानंतर त्यांनी त्याला फोन केला, मात्र त्याच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. प्रॉपटीच्या नावाने त्याने त्यांने दोन कोटीच्या साडेतीन किलो सोन्याचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धिरेंद्र शुक्लाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे आदेश वरळी पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र तो गेल्या एक वर्षांपासून सतत गुंगारा देत होता. अखेर त्याला वरळी येथून पोलिसांनी अटक केली. त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.