गुरुसिद्धप्पाच्या प्रेयसीसह स्पाच्या कर्मचार्याला अटक
वरळीतील पोलीस खबरी-आरटीआय कार्यकर्ता हत्याप्रकण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – पोलीस खबरी असलेल्या आरटीआय कार्यकर्ता गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे याच्या हत्येप्रकरणी शनिवारी अन्य दोन आरोपींना वरळी पोलिसांनी अटक केली. त्यात गुरुसिद्धप्पाची प्रेयसी मेरी जोसेफ आणि स्पाचा मॅनेजर शमशाद खान ऊर्फ सुरज यांचा समावेश असून या दोघांनी हत्येची पूर्वकल्पना होती, सुरजने स्पामध्ये मारेकर्यांना प्रवेश मिळवून दिले आणि स्पाचे सीसीटिव्ही फुटेज बंद केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टाने मंगळवार ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली असून यापूर्वी संतोष सोपान शेरेकर, मोहम्मद फिरोज इस्माद्दीन अन्सारी आणि साकिब सर्फराज अन्सारी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती.
गुरुसिद्धप्पा हा विलेपार्ले परिसरात राहत असून तिथे तो आरटीआय कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात सहा दखलपात्र तर पाच अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. काही वर्ष तो पोलीस खबरी म्हणूनही काम करत होता. २४ जुलैला तो वरळीच्या पापण रोड, बीएमसी हबसमोरील सॉफ्ट टच स्पामध्ये त्याची प्रेयसी मेरी जोसेफ हिला भेटायला गेला होता. त्यानंतर तो तिच्यासह स्पाच्या इतर तीन कर्मचार्यासोबत शीव येथील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टी करुन तो पुन्हा वरळी येथे आला होता. रात्री याच स्पामध्ये घुसलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने गुरुसिद्धप्पाची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच संतोष शेरेकर याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याने मोहम्मद फिरोज आणि साकिब अन्सारी या दोघांना गुरुसिद्धप्पाच्या हत्येची सहा लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज आणि नंतर साकिब अन्सारी या दोन्ही मारेकर्यांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते.
या गुन्ह्यांत मेरी जोसेफ आणि शमशाद खान याचे नाव समोर आले होते. गुरुसिद्धप्पाचा गेम होणार असल्याची पूर्वकल्पना मेरीला होती. प्रेयसी असताना तिने ही माहिती त्याला सांगितली नव्हती. शमशाद हा स्पाचा मॅनेजर असून त्याने संतोष शेरेगरच्या सांगण्यावरुन मारेकर्यांना स्पामध्ये प्रवेश मिळवून दिला होता. स्पाचा शटर उघडून त्याने त्यांना आतमध्ये घेतले होते. हत्येच्या वेळेस त्याने स्पामधील सीसीटिव्ही कॅमेरे बंद केले होते. गुरुसिद्धप्पाची हत्या केल्यानंतर त्याने दोन्ही मारेकर्यांना पळून जाण्यात मदत केली. त्यानंतर तो निघून गेला होता. चौकशीदरम्यान त्याने ही माहिती लपवून ठेवली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांनाही शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या तपासात संतोष आणि गुरुसिद्धप्पा यांच्यात वाद होता. तो संतोषच्या विरोधात पोलीस ठाण्यात तसेच इतर शासकीय कार्यालयात तक्रारी करत होता. त्याचा त्याला प्रचंड त्रास झाला होता. त्याच्या तक्रारीमुळे त्याच्या व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे संतोषने सहा लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली होती. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.