नोकरीच्या आमिषाने चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

तीन बांगलादेशी महिलांची सुटका तर एका आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – नोकरीच्या आमिषाने बांगलादेशातून आणलेल्या महिलांची तस्करी करुन हॉस्पिटलसह मेडीकलमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या मदतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून या तिघींना एका महिन्यांपूर्वी बांगलादेशातून नोकरीच्या आमिषाने मुंबईत आणण्यात आले होते. मेडीकलनंतर या तिघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत मन्सार अहमद मोहम्मद हसन शेख या 53 वर्षांच्या आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर तिघांमध्ये आकाश ऊर्फ शाहीन, संजीव ऊर्फ बच्चन आणि मेहंदी हसन यांचा समावेश असून या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना शुक्रवारी रात्री उशिरा मालाडच्या मालवणी, एनसीसी, गेट क्रमांक सहामधील एका रुममध्ये पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या महिलांची चौकशी केल्यानंतर त्या तिघीही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. या तिघींना एक महिन्यांपूर्वीच बांगलादेशातून भारतात आणण्यात आले होते. विविध हॉस्पिटलसह मेडीकल शॉपमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करुन मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मालवणीतील संबंधित रुममध्ये ठेवण्यात आले होते. हॉस्पिटल व मेडीकलमध्ये नोकरी न देता त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जाणार होते. त्यांच्या मदतीने आरोपींनी तिथे सेक्स रॅकेट सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

त्यांच्या चौकशीतून चौघांचे नावे समोर आले होते. त्यानंतर या तिन्ही महिलांची सुटका करुन त्यांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा खरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मन्सार शेख, आकाश, संजीव आणि मेहंदी या चौघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मन्सार शेख याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या इतर तीन सहकार्‍यांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने नोकरीच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही बांगलादेशी महिलांची तस्करी केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page