मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – कर्जाची परतफेड न करता स्वतच्या अधिकार्याचा गैरवापर करुन शाखा व्यवस्थापकानेच खातेदाराचे सोन्याचे दागिने परत करुन मंगल क्रेडिट व फिन्कॉर्प लिमिटेड या क्रेडिट पतपेढी संस्थेची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक सागर प्रकाश सोनावणे आणि त्याचा सहकारी भरत हंजरीमल सोनी अशा दोघांविरुद्ध धारावी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोघांनी संगनमत करुन संस्थेची 17 लाख 67 हजाराची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आली आहे.
भाविन हरकिशन सिधवा हे अंधेरी परिसरात राहत असून मंगल क्रेडिट व फिन्कॉर्प लिमिटेड या क्रेडिट पतपेढी संस्थेत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. या संस्थेचे धारावीतील राजीव गांधी नगर, मुस्लिमनगर परिसरात एक शाखा आहे. याच शाखेत सागर सोनावणे हा ऑगस्ट 2023 पासून शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. संस्थेकडून गरजू लोकांच्या अर्जानंतर त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करुन विविध कर्जाचे वाटप केले होते. त्यामुळे संस्थेच्या व्यवहाराची दर एक महिन्यांनी ऑडिट केले जाते. ऑगस्ट 2024 रोजी केलेल्या ऑडिटदरम्यान 17 लाख 67 हजार 883 रुपयांची तफावत दिसून आली होती. त्यामुळे ही बाब शाखा व्यवस्थापक सागर सोनावणे व इतर संंबंधित अधिकार्यांना सांगून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता.
या संपूर्ण प्रकरणाची नंतर संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशावरुन चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यात सागर सोनावणे याने भरत सोनी यांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. संस्थेकडून भरत सोनी, जयवंत लोढा, अंकिता लोढा यांनी गोल्ड लोन घेतले होते. त्यापैकी काही रक्कम जमा करुन त्यांनी ते दागिने सोडवून घेतले होते. मात्र 17 लाख 67 हजार 883 रुपये जमा न करता त्यांना त्यांचे सोने परत करण्यात आले होते. त्यासाठी सागर सोनावणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन या तिघांना अप्रत्यक्षपणे मदत केली होती. हा प्रकार उघडकीस येताच भरत सोनी आणि जयवंत लोढा यांची जबानी नोंदविण्यात आली होती,
यावेळी त्यांनी सागर सोनावणेच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली देताना संस्थेत ही रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते, इतकेच नव्हे तर त्यांनी स्टॅम्पपेपर लिहून दिले होते, मात्र त्यांनी फसवणुकीची रक्कम संस्थेत जमा न करता त्याचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच संस्थेच्या भाविन सिंधवा यांनी धारावी पोलिसांत सागर सोनावणे आणि भरत सोनी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.