मालाड येथील घरफोडीचा करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

शंभर टक्के चोरीच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – सासूच्या निधनानंतर दहाव्या कार्यक्रमासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या मालाड येथील राहत्या घरात प्रवेश करुन लाखो रुपयांच्या दागिन्यांसह कॅश असा मुद्देमाल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह महिला सहकारी आणि इतर दोघांना अशा चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. अब्दुल रफिक हमीद अन्सारी ऊर्फ अप्पू खोटा, दिपाली डंपर भूल ऊर्फ दिपाली विशाल शर्मा, सुरज संजय जाधव आणि आकाश चंद्रकांत पवार अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांकडून चोरीचे सर्व दागिने आणि कॅश असा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आला आहे. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील अब्दुल अन्सारी हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने अलीकडेच कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरुद्ध 40 हून अधिक चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी सांगितले. नजीर मुराद खान हा मालाड येथे त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. 24 मेला त्याच्या सासूचे निधन झाले होते. त्यामुळे खान कुटुंबिय जळगाव येथील पाथरी गावी गेले होते. सर्व विधी केल्यानंतर ते सर्वजण मुंबईत आले होते. 1 जूनला त्यांच्या सासूचा दहाव्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ते सर्वजण 30 मेलाच पुन्हा त्यांच्या गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरी प्रवेश करुन कपाटातील शंभर ग्रॅम् वजनाचे विविध सोन्याचे, 240 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि ऐंशी हजाराची कॅश असा पावणेपाच लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

3 जूनला नजीर खान हे त्यांच्या घरी आले असता त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी कुरार पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घरफोडीची पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले होते.

या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून अब्दुल अन्सारी, दिपाली शर्मा, सुरज जाधव आणि आकाश पवार या चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल अब्दुलने दिपालीच्या घरी लपवून ठेवला होता, पोलिसांना चोरी माहिती मिळाल्याचे समजताच तिने सर्व दागिने आणि कॅश कचर्‍याच्या डब्ब्यात फेंकून दिले होते, मात्र हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या टोळीचा अब्दुल हा म्होरक्या असून तो गोरेगाव येथे राहतो. दिपाली ही मालाड येथे राहत असून ती गृहिणी आहे तर सुरज हा रिक्षाचालक असून चोरीनंतर पळून जाण्यास त्याने इतर सहकार्‍यांना मदत केली होती. आकाश हा दिवा येथे राहत असून डिलीव्हरी बॉयचे काम करत असल्याचे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी सांगितले. अब्दुलने कुरारच्या हद्दीत तीन घरफोडी केल्याची कबुली दिल्याने या तिन्ही घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तो चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कुरार, दिडोंशी, आरे पोलीस ठाण्यात चाळीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे, पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश नलावडे, पोलीस हवालदार किरण हवाळे, तानाजी मोरे, समरेश भोगले, सागर पवार, पोलीस शिपाई अक्षय तांबे, रमेश खांडवी, शंकर सोनावणे, बबन राठोड, संतोष फडतरे, गणेश सातपुते, श्रीकांत गोरे यांनी केली. गुन्हा दाखल होताच अवघ्या पाच दिवसांत चार आरोपींना चोरीच्या शंभर टक्के मुद्देमालासह अटक केल्याने या पोलीस पथकाचे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page