आयआयटीच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअर प्रोफेसरची सहा कोटीची फसवणुक
केअरटेकर महिलेविरुद चोरीसह अपहार-फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – आयआयटीच्या इलेक्ट्रीक इंजिनिअर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध प्रोफेसरची त्यांच्याच घरी केअरटेकर म्हणून काम करणार्या महिलेने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निकिता विजय नाईक या केअरटेकर आरोपी महिलेविरुद्ध पवई पोलिसांनी चोरीसह अपहार आणि फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर तक्रारदार वयोवृद्ध प्रोफेसरच्या तीन फ्लॅटसह बँक लॉकरमधील विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने, बचत खात्यातील कोट्यवधी रुपयांची कॅश असा सुमारे सहा कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तिची चौकशी सुरु असून तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनमोहन स्वरुप अग्रवाल हे 82 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार पवईतील हिरानंदानी गार्डन, ग्लेन हाईट्स या अपार्टमेंटमध्ये राहतात. 2005 साली आयआयटीच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअर विभागातून ते प्रोफेसर म्हणून निवृत्त झाले आहेत. तुषार नावाचा त्यांचा एक मुलगा असून तो ऑर्थोपेडी सर्जन आहे. सध्या तो त्याची आई मिरा अग्रवाल यांच्यासोबत पुण्यात वास्तव्यास आहे तर त्यांची मुलगी पवई परिसरात राहते. तुषार हा पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये कामाला असून दररोज येणे-जाणे शक्य नसल्याने त्याने तिथे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या सोळा वर्षांपासून ते पवईतील राहत्या घरी एकटेच राहत होते. त्यांच्या मालकीचे पवई परिसरात चार फ्लॅट असून त्यापैकी एका फ्लॅटमध्ये ते राहतात तर इतर तीन फ्लॅट त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यांचे पाच वेगवेगळ्या बँकेत खाती असून एका बॅकेत लॉकर आहे. याच लॉकरमध्ये त्यांनी त्यांच्या प्रॉपटीचे दस्तावेजासह मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत.
पूर्वी ते योगासाठ जवळच्या एका गार्डनमध्ये जात होते. तिथे त्यांची निकिता नाईकशी ओळख झाली होती. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. अनेकदा निकिता ही त्यांच्या घरी येत होती. यादरम्यान तिने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. या ओळखीनंतर तिने त्यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम सुरु केले होते. काही दिवसांत तिने त्यांचा विश्वास संपादन केला होता. ते एकटेच राहत असल्याने तसेच दैनदिन कामासाठी तिची मोठी मदत होत असल्याने त्यांचाही तिच्यावर प्रचंड विश्वास बसला होता. केअरटेकर म्हणून काम करताना ती त्यांच्या सोसायटीचे मेन्टन्स चेक भरणे, आश्वयक वस्तूंसह औषधे आणून देणे, बाहेर फिरायला घेऊन जाणे, घरातील सर्व काम करत होती.
82 वर्षाचे असल्याने कालातंराने त्यांना थकवा जाणवू लागला होता. त्यांना डोळ्यांनी दिसेनासे झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पैशांसाठी त्यांना वारंवार एटीएममध्ये जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी तिला त्यांचे डेबीट-क्रेडिट कार्ड आणि पासपोर्ट दिले होते. त्यानंतर ती बँकेतून त्यांना पैसे काढून देत होती. अनेकदा ती त्यांच्याकडून कोर्या धनादेशावर स्वाक्षरी घेत होती. याच धनादेशावरुन तिने त्यांच्या बँक खात्यातून तिच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले होते. गेल्या तीन वर्षांत तिने त्यांच्या बँक खात्यातून एक कोटी तीन लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार केला होता. फेब्रुवारी 2025 पासून त्यांना दिसने बंद झाले होते. त्यामुळे तिने त्यांना विक्रोळीतील कन्नमवारनगर, टाऊन व्हिल केअर या वृद्धाश्रात टाकले होते.
एप्रिल महिन्यांत तिने काही कायदेशीर कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी घेतली होती. त्यात तिने त्यांच्या मालकीचे फ्लॅट गिफ्ट डिड म्हणून केल्याचे दस्तावेज बनविले होते. अशा प्रकारे तिने त्यांच्या 4 कोटी 89 लाख रुपयांच्य तीन फ्लॅट स्वतच्या नावाने करुन घेतले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या बँकेच्या लॉकरमधील विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने, पॅनकार्ड, आधारकार्ड, फ्लॅटचे मूळ दस्तोज, शेअर, सर्व बँकाचे धनादेशासह इतर महत्त्वाचे दस्तावेजाचा अपहार केला होता. मनमोहन अग्रवाल यांना विक्रोळीतील वृद्धाश्रात टाकल्याची माहिती अलीकडेच त्यांचा मुलगा तुषारला समजली होती. त्यामुळे तो मे महिन्यांत मुंबईत आला हेता. त्यांची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांनी निकिता नाईकविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी तुषार अग्रवालला निकिताने त्यांच्या वडिलांच्या वयोवृद्धासह आजारपणाचा आणि दिसत नसल्याचा फायदा घेऊन गेल्या तीन वर्षांत सुमारे सहा कोटी रुपयांच्या प्रॉपटीसह सोन्याचे दागिने आणि कॅशचा अपहार केल्याचे समजले होते. हा प्रकार तुषारकडून समजताच त्यांनी पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निकिता नाईक हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि चोरीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच निकीताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरु असून या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.