मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील दोन गुन्हेगारांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. सलीम मतीन सय्यद ऊर्फ मोजेस आणि अकबर अहमद सय्यद अशी या दोघांची नावे असून ते दोघेही माहीमचे रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेने सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सुवर्णा सुनिल खाड्ये ही 65 वर्षांची वयोवृद्ध महिला परळ येथे राहते. 18 मेला ती तिच्या नातेवाईकासोबत दादर येथे सिनेमा पाहण्यासाठी आली होती. सिनेमा संपल्यानंतर त्या दोघीही रात्री सव्वानऊ वाजता दादर येथील टिळक ब्रिजवरुन दादर टीटीच्या दिशेने जात होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन तिच्या गळ्यातील ऐंशी हजाराचे मंगसूत्र चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांत सलीम सय्यद आणि अकबर सय्यद या दोघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, विनोद पाटील, पोलीस हवालदार चव्हाण, तांबे, पोलीस शिपाई जुवाटकर, देशमाने, मेटकर, तोडासे, बहादुरे, नवले, बारशी, सोनवलकर, बंजारा, नेहारे, पोलीस हवालदार ठोके यांनी माहीम येथून सलीम सय्यद आणि अकबर सय्यद या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच ही सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. तपासात या दोघांनी माटुंगा येथे अशाच प्रकारे अन्य एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेने सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांकडून दोन्ही गुन्ह्यांतील 12 ग्रॅम वजनाची सोन्याची लगट जप्त केलीअसून त्याची किंमत सुमारे 87 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही आरोपी माहीम परिसरात राहतात. यातील सलीम हा कलमकाम करतो तर अकबर हा काहीच कामधंदा करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.