लहान भावाच्या हत्येच्या गुन्ह्यांतील तक्रारदार भावावर हल्ला
जामिनावर आलेल्या आरोपीविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – चार वर्षांपूर्वी लहान भावाच्या हत्येच्या गुन्ह्यांतील तक्रारदार मोठ्या भावावर एका आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. या हल्ल्यात मोहम्मद शाकीब मोहम्मद इस्त्राईल शेख हा 27 वर्षांचा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन हल्लेखोर मोईन मुर्तझा शेख याला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोईनने जखमी मोहम्मद शाकीबचा लहान भाऊ मतिन शेख याची हत्या केली होती, याच गुन्ह्यांत तो जामिनावर होता, मात्र त्याने हत्येच्या गुन्ह्यांतील तक्रारदारावर हल्ला केल्याने त्याच्याविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली असून त्याचा जामिन रद्द होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.
ही घटना रविारी सायंकाळी पावणेसहा वाजता कुर्ला येथील बंदरभवन कॉलेजसमोरील पानटपरीजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद शाकीब हा कुर्ला येथील कुरेशीनगर परिसरात राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. मोईन हादेखील याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्याला मतिन नावाचा एक लहान भाऊ होता. 2021 रोजी त्याची मोईन आणि शहनवाज नुरुद्दीन या दोघांनी हत्या केली होती. या हत्येनंतर या दोघांविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत नंतर मोईनला पोलिसांनी अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती.
8 जूनला मोहम्मद शाकीब हा कसाईवाडा, हुसैन गार्डनजवळ बसला होता. यावेळी तिथे मोईन आला आणि त्याने तुझ्या भावाचा गेम झाला आहे, आता तुझा नंबर आहे अशी धमकी देऊन निघून गेला होता. त्यानंतर मोहम्मद शाकीब तेथून निघून गेला. काही वेळानंतर मोईन त्याच्या बाईकवरुन तिथे आला आणि त्याने पुन्हा त्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर त्याने त्याच्याकडील चाकूने त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याचा वार चुकविल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार तिथे उपस्थित काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी मोईनला थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मोहम्मद शाकीबला त्याचा मित्राने तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार चुन्नाभट्टी पोलिसांना सांगितला होता. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मोईन शेख याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर असताना मोईनने हत्येच्या गुन्ह्यांतील तक्रारदारावरच हल्ला केल्याने त्याचा जामिन रद्द करण्यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.