बकरी ईदनिमित्त गावी गेलेल्या व्यापार्‍याच्या घरी चोरी

चोरट्याकडून साडेआठ लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – बकरी ईदनिमित्त उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील गावी गेलेल्या व्यापार्‍याच्या घरासह किराणा मालाच्या दुकानातील साडेआठ लाखांचा मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने हातसफाई केल्याची घटना ताडदेव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अब्दुल मुनाफ इब्रारक हुसैन खान हे ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात राहतात. काहीच अंतरावर त्यांचा भाऊ मोहम्मद अक्रम अनिसुद्दीन अन्सारी हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर एक किराणा मालाचे दुकान आहे. बकरी ईदनिमित्त तो त्याच्या कुटुंबियांसोबत उत्तरप्रदेशातील बिजनौर या गावी गेला होता. त्याच्या घरी कोणी नसल्याने अब्दुल खान हे तिथे अधूनमधून जात होते. शुक्रवारी 6 जूनला सकाळी सात वाजता त्यांना त्यांचा भाऊ मोहम्मद अक्रमचा कॉल आला होता. त्याने त्यांच्या दुकानासह घरी चोरी झाल्याचे सांगून तिथे जाऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे अब्दुल खान हे तिथे गेले होते.

घरासह किराणा मालाची पाहणी केल्यानंतर त्यांना घरी कोणीही नसल्याची संधी अज्ञात चोरट्याने प्रवेश केल्याचे दिसून आले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते, दोन्ही कपाट उघडे होते. दरवाज्याची कडी कुलूप तुटलेली होती. घरातील कपाटासह दुकानातील ड्राव्हरमधून विविध सोन्याचे दागिने आणि 7 लाख 38 हजाराची कॅश असा 8 लाख 62 हजार 600 रुपयांचा मुद्देमालाची चोरी झाल्याचे दिसून आले होते. हा प्रकार उघडकीस येताच अब्दुल खान यांनी ताडदेव पोलिसांना ही माहिती दिली.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अब्दुल खान यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बकरी ईदनिमित्त गावी गेलेल्या व्यापार्‍याच्या घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने ही हातसफाई केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page