मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – रॉबरीच्या गुन्ह्यांतील दोन टोळ्यांचा शाहूनगर आणि नवघर पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या पाचही मुलांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर अन्य एक आरोपी मुरगन राजू मुदलियार याला अटक केल्यानंतर वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही टोळी चोरीच्या उद्देशाने प्रसंगी एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
संदीप गजानन राणे हे व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मुलुंड परिसरात राहतात. रविवारी रात्री उशिरा पावणेचार वाजता ते आर्चिंड स्कूलजवळून जात होते. यावेळी त्यांना बाईकवरुन हुल्लडबाजी करताना चार मुले जाताना दिसले. काही वेळानंतर ते मुले पुन्हा तिथे आले आणि त्यांनी संदीप राणे यांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. ही माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पळून गेलेल्या सोळा ते सतरा वयोगटातील तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते तिघेही मुलुंड परिसरात राहत असून शिक्षण घेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध जबरी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्यांची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
दुसरी घटना शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शेहजाद इकराम अहमद हा माहीम येथे राहत असून मजुरीचे काम करतो. रविवारी दुपारी दोन वाजता तो त्याचा भाऊ इम्रान अहमद याच्यासोबत माहीम येथील शाहूनगरच्या पुलावरुन जात होता. यावेळी तिथे आलेल्या तीनजणांच्या टोळीने रॉबरीच्या उद्देशाने त्यांच्यावर सिमेंटचा पत्रा आणि लाकडी बांबूने प्राणघातक हल्ला केला. त्यात इम्रान हा गंभीर जखमी झाला होता. यावेळी या तिघांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि अडीच हजाराची कॅश चोरी करुन पलायन केले होते. ही माहिती समजताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी इम्रानला तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी रॉबरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात सोळा व सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यामुळे या दोघांनाही बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तिसरा आरोपी मुरगन राजू मुदलियार याला नंतर पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून चोरीच्या मोबाईल कॅश असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मुरगनची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या अटकेने रॉबरीच्या अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.