मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला निर्मलनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी साडेसहा लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवार 15 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याला ते एमडी ड्रग्ज कोणी दिले होते, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आला होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
खार परिसरात काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रमेश बहिरवाडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, पोलीस उपनिरीक्षक रमेश बहिरवाडे, सुदर्शन बनकर, पोलीस हवालदार परब, पोलीस शिपाई जाधव, अतिग्रे आदी पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शुक्रवारी रात्री उशिरा खार येथील प्रसाद एन एक्स हॉटेलसमोर एक तरुण आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 32 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये आहे. हा साठा जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.