पाच टक्के परताव्याचे गाजर दाखवून 5.13 कोटींची फसवणुक

133 गुंतवणुकदारांना गंडा घालणार्‍या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – पाच टक्के आकर्षक परताव्याचे गाजर दाखवून मानखुर्द येथील ड्रिम सनशाईन डिजीटल प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकासह पार्टनरने 133 गुंतवणुकदारांची 5 कोटी 13 लाख 85 हजाराची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह चार पार्टनर अशा पाचजणांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये कंपनीचा मालक अमानतअली अन्सारी, त्याचे चार पार्टनर भागीदार रहिम अब्दुल अन्सारी, नवाजीस अली अन्सारी, नईम सरवर आणि योगिनी शिर्के यांचा समावेश आहे. कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावून मालकासह पार्टनरने पलायन केले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कंपनीकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी मानखुर्द पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सलमान सईद अहमद खान हा ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरात राहत असून बीकेसी येथील एका खाजगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करतो. चिता कॅम्प परिसरात नईम सरवर मुसा अंजुम यांचे फेमस नावाचे एक जिम असून तो त्यांच्या परिचित आहेत. त्यांनी त्याला ड्रिम सनशाईन डिजीटल प्रायव्हेट कंपनीची एक आकर्षक गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. या कंपनीत गुंतवणुक केल्यास पाच टक्के परतावा मिळत असल्याने त्यांनी कंपनीत गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मानखुर्द येथील मोहिते पाटील नगर परिसरात असलेल्या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्याची अमानतअली अन्सारीशी ओळख झाली होती.

यावेळी त्याच्यासोबत योगिनी शिर्के, नईम सरवर आणि रहिम अन्सारी हे तिघेजण होते. त्याने तो कंपनीचा मालक तर इतर तिघेही कंपनीत त्याचे पार्टनर असल्याचे सांगितले होते. या तिघांनी त्याला गुंतवणुक योजनेची माहिती सांगितली होती. त्यांची कंपनी रिअल ऑस्सी वॉटर, साखर, खजूर आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करत असून त्यातून कंपनीला मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो. त्यातून कंपनीत त्यांच्या गुंतवणुकदारांना जास्त फायदा मिळवून देत असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी कंपनीत सुरुवातीला दोन लाखांची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीवर त्यांना नियमित पाच टक्के परतावा मिळत होता. त्यांना त्यांच्या कंपनीवर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यासह नातेवाईक आणि परिचितांना कंपनीत गुंतवणुक करण्याचा सल्ला लिा होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि परिचित अशा आठजणांनी कंपनीत 23 लाख 70 हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनाही जानेवारी 2026 पर्यंत परतावा मिळत होता. मात्र फेब्रुवारी 2026 पासून त्यांना परताव्याची रक्कम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे ते सर्वजण मानखुर्द येथील कंपनीच्या कार्यालयात गेले होते.

तिथे त्यांना कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे तसेच तिथे मोठ्या प्रमाणात गुतवणुकदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून त्यांना कंपनीचे मालक तसेच इतर पार्टनर कंपनीला टाळे लावून पळून गेल्याचे समजले. यावेळी तिथे 133 हून अधिक गुंतवणुकदार उपस्थित होते. या सर्वांनी कंपनीत 5 कोटी 13 लाख 85 हजार रुपांची गुंतवणुक केली होती. या सर्वांना सुरुवातीला पाच टक्के परतावा दिल्यानंतर ते सर्वजण पळून गेले होते. त्यामुळे या सर्वांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर कंपनीचा मालक अमानतअली अन्सारी, त्याचे चार पार्टनर भागीदार रहिम अब्दुल अन्सारी, नवाजीस अली अन्सारी, नईम सरवर आणि योगिनी शिर्के यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाचही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 133 गुंतवणुकदारांची 5 कोटी 13 लाखांची फसवणुक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे, आणखीन काही गुंतवणुकदार तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page