मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही कर्मचार्यांना हाताशी धरुन गोल्ड तस्करी करणार्या एका टोळीचा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तेराजणांना या अधिकार्यांनी अटक केली असून त्यात सहा श्रीलंका, दोन बांगलादेशी, विमानतळावरील दोन कर्मचारी, दोन हॅण्डलर व एका मुख्य आरोपीचा समावेश आहे. ऑपरेशन गोल्ड स्वीपअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत या अधिकार्यांनी 12 कोटी 58 लाख रुपयांचे 10 किलो 448 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहेत. मोहम्मद इम्रान, वसीम शेख, संतोष विनोद कनोजिया, राहुल सुभाष जाधव, मोहम्मद रिमशान मोहम्मद रफिक, अनिल गुरुशांत अरमान, मोहम्मद कमाल हुसैन, मोहम्मद साजिथ मोहम्मद शालिहीन, महफुज आलम, मोहम्मद रशीद मोहम्मद निजार, मोहम्मद इफ्तिकार मोहम्मद जौफर, सैनूल इनाफ सैनूल इब्राहिम, मोहीदीन रिझलान सराफुल अनाम अशी या प्रवाशांसह कर्मचार्यांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून मोठ्या प्रमाणात गोल्ड तस्करीचे प्रमाण वाढले होते. काही तस्कर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचार्यांना हाताशी धरुन गोल्ड तस्करी करत होते. विदेशातून आणलेले गोल्ड या कर्मचार्यांना दिल्यानंतर ते संंबंधित प्रवाशांना विमानतळाबाहेर गोल्ड आणून देत होते. याबाबतची माहिती प्राप्त होताच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी गोल्ड तस्करी करणार्या आरोपींच्या अटकेसाठी ऑपरेशन गोल्डन स्वीप नावाची एक मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्गत दुबई, सिंगापूर आणि ढाका येथून आणलेल्या गोल्डसह श्रीलंका आणि बांगलादेशी प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनी गोल्ड तस्करी केल्याची कबुली देताना याकामी त्यांना विमानतळावरील दोन हॅण्डलर, दोन कर्मचारी आणि एका मुख्य आरोपीने मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर या सर्वांना विमानतळ परिसरातून या अधिकार्यांनी ताब्यात घेतले.
अटक आरोपींमध्ये मोहम्मद साजिथ, मोहीदीन, सैनूल, मोहम्मद इफ्त्तिकार, मोहम्मद रिशाद हे श्रीलंकन तर मोहम्मद कमाल, महफुज हे दोघेही बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांच्याकडून या अधिकार्यांनी 10 किलो 448 ग्रॅम वजनाचे गोल्ड जप्त केले असून त्याची किंमत 12 कोटी 58 लाख रुपये इतकी आहेत. तपासात गोल्ड तस्करी करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी आहे. ही टोळी दुबईहून सिंगापूर, बँकाँक आणि ढाका येथून मुंबईत गोल्ड घेऊन येत होते. ते सर्वजण वाहक म्हणून काम करताना त्यांच्या शरीरात अंड्याच्या अकाराच्या मेणांच्या कॅप्सुलमध्ये गोल्ड लपवून आणत होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर ते संबंधित गोल्ड विमानतळावरील कर्मचार्यांना होते. या कर्मचार्यांकडून ते गोल्ड संबंधित हॅण्डलर आणि मुख्य आरोपी असलेल्या रिसीव्हरकडे दिले जात होते. गोल्ड तस्करीसाठी प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे ते विदेशातून गोल्ड आणून त्याची तस्करी करत होते. या सर्व आरोपींविरुद्ध गोल्ड तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करुन नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या सर्वांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.