ईमेलवर पत्नीविषयी आक्षेपार्ह मजकूर देऊन विनयभंग
हायप्रोफाईल सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सोसायटीच्या अधिकृतकृत ईमेलवर ग्रुपवर पत्नीविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर देऊन विनयभंग केल्याप्रकरणी कांदिवलीतील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या सेके्रटरीविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद वर्मा असे या सेक्रेटरीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे.
41 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असून ते आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. सध्या ते त्यांच्या पत्नी, आई आणि मुलासोबत राहतात. त्यांच्या सोसायटीमध्ये एकूण 400 फ्लॅट असून एकूण सोळा लोकांची सोसायटी कमिटी आहे. त्यात ते स्वत सभासद असून इतर पदाधिकार्यांमध्ये दोन स्वतंत्र संचालक, प्रत्येकी एक अध्यक्ष, सेक्रेटरी विनोद वर्मा आणि खजिनदार व इतर सभासदांचा समावेश आहे. सोसायटीचे सर्व कामकाज अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार पाहतात. सोसायटीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी त्यांनी सोसायटीची एक ईमेल आयडी बनविली आहे.
सोसायटीचे काही मॅसेज असल्यास त्या ईमेल आयडीवरुन सोसायटीच्या सदस्य आणि कमिटी मेंबरला पाठविले जाते. त्यानंतर संबंधित पदाधिकारी त्यांच्या तक्रारीचे निरासन करतात. अनेकदा तक्रारदार स्वतहून सोसायटीच्या प्रत्येक कामात सहभागी होतात. त्यातून त्यांचे सेक्रेटरी विनोद वर्मा यांच्याशी अनेकदा खटके उडत होते. तो त्यांच्या कामात अडवणूक करुन अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता. याच कारणावरुन त्यांच्यात अनेकदा शाब्दिक बाचाबाची झाली आहे.
17 ऑक्टोंबरला सोसायटीची कमिटी मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी 10 ऑक्टोंबरला सकाळी साडेअकरा वाजता तक्रारदारांनी मिटींगच्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे काढून सोसायटीच्या ईमेलवर पाठविले होते. या मुद्यावरुन विनोद वर्माने त्यांच्या सोसायटीच्या पदाधिकार्यासाठी असलेल्या ईमेलवर त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. याच मेलवर विनोदने तक्रारदारांना आम्ही तुझ्यासारख्या दलालांना पाहिले आहे, जे विकासकामसाठी काम करतात आणि त्यांचा अजेंडा पुढे नेतात. सर्वांना माहित आहे तू तुझी पत्नीला कुठे पाठवतो. त्यामुळे लपविण्यास काहीच राहिले नाही. तिला खुलेपणाने पाठव असा मेल पाठविला होता.
हा संवाद ईमेलमध्ये पाठविल्याने काही पदाधिकार्यांनी पाहिले आहे. त्यातून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीची बदनामी झाली आहे. त्यांच्या पत्नीने संबंधित आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पाहिल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी तिच्या वतीने समतानगर पोलिसांत सोसायटीचे सेक्रेटरी विनोद वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसाीं 79, 356 (2) भारतीय न्याय सहिता आणि 67 आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही 2023 साली विनोद वर्मावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे बोलले जाते. याबाबत तक्रारदार विनोद वर्माविरुद्ध लवकरच कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.