कौटुंबिक वादातून अल्पवयीन मुलीची हत्या करुन पित्याचे पलायन
हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून स्वतच्याच अजगरी मोहम्मद सुलेमान कुजरा या चौदा वर्षांच्या मुलीची तिच्याच पित्याने तिक्ष्ण हत्याराने मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तिची आई नसीमा सुलेमान कुजरा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी आरोपी पिता मोहम्मद सुलेमान रज्जाक कुजरा याच्याविरुद्ध वाकोला पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सुलेमान हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान सांताक्रुज येथील कालिना, ओल्ड सोसायटी रोडच्या तकदीर हॉटेल, शिवनगर चाळीत घडली. याच चाळीतील पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक 124 मध्ये सुलेमान हा त्याची पत्नी नसीमा आणि मुलगी अजगरी यांच्यासोबत राहत होता. तो पेंटर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री त्याचे पत्नीसह मुलीसोबत कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. याच वादातून रागाच्या भरात त्याने नसीमा आणि अजगरी यांच्यावर तिक्ष्ण हत्यारासह जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी होऊन बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर तो घरातून पळून गेला होता.
दुपारी हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर त्यांनी ही माहिती वाकोला पोलिसांना दिली. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्धावस्थेत घरात पडलेल्या दोन्ही मायलेकींना पोलिसांनी तातडीने जवळच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे अजगरी हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर नसीमा हिच्यावर उपचार सुरु केले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी नसीमाचा भाऊ निजामुद्दीन कारी राईन याच्या तक्रारीवरुन वाकोला पोलिसांनी सुलेमान कुजरा याच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर सुलेमान हा पळून गेला आहे. त्यामुळे त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथकि तपासात उघडकीस आले आहे.
मात्र वादामागील कारण काय होते याचा उलघडा होऊ शकला नाही. सुलेमानच्या अटकेनंतरच या घटनेमागील कारणाचा खुलासा होईल असे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले. दरम्यान गुरुवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.