मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपी तरुणांना अंधेरी आणि कुरार पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही कोरियाग्राफर असून ती अंधेरी परिसरात राहते. चौदा वर्षांची पिडीत तिची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. 18 वर्षाचा आरोपी तिच्या परिचित आहे. 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत आरोपीने तिच्याशी अनेकदा शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या राहत्या घरी तिला आणून ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.
हा प्रकार अलीकडेच पिडीत मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. त्यानंतर तिने अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस बुधवारी पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना मालाड परिसरात घडली. पिडीत मुलगी ही चौदा वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहते. याच परिसरातील एका शाळेत ती शिक्षण घेत आहे. मंगळवारी 14 ऑक्टोंबरला ती घराबाहेर असलेल्या ड्रममधून पाणी काढत होती. याच दरम्यान तिचा शेजारी राहणारा आरोपी तरुण तिथे आला. त्याने तिचा हात पकडून तिला जबदस्तीने त्याच्या घरी आणले आणि घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिला त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती.
घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला होता. त्यानंतर ते सर्वजण कुरार पोलीस ठाण्यात गेले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांर्तत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपी तरुणांना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. पिडीत दोन्ही मुलींची लवकरच मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.